खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांचा विश्वास
ठाणे: लोकसभा निवडणुकीतील माझ्या विजयाप्रमाणेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कळवा-मुंब्रा विधानसभेतील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनाही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असे जाहीर उद्गार कल्याण लोकसभेतील शिवसेना खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी काढले.
कळवा-मुंब्र्यात अहंकार विरुद्ध विकास हीच लढाई आहे असे मत कळवा-मुंब्रा विधानसभेतील महायुतीचे उमेदवार नजीव मुल्ला यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील माता भगिनींमधील मातृशक्ती नजीब मुल्ला यांना निवडून आणणार असल्याचा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केला. तर कळवा मुंब्र्यात नजीब मुल्ला यांना विजयी करुन महायुतीचे वर्चस्व निर्माण करा. असे आवाहन भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केले.
महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या निवडणुक प्रचारार्थ कळवा विभागाच्या वतीने शनिवारी सायबा हॉल, मनिषा नगर, कळवा येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिका-यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक नेते उपस्थित होते. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने माझा विजय झाला. पण कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात आपला माणूस नसल्याने माझ्यामार्फत कामे होताना त्रासही होत आहे. यासाठी पक्ष न पाहता महायुतीचा उमेदवार म्हणून नजीब मुल्ला यांना निवडून आणायचे आहे. आपल्या मतदारसंघातील आपला हक्काचा माणूस म्हणून नजीब मुल्ला यांना निवडून आणण्यासाठी प्रचाराचे नियोजन करा, असे आदेशच कल्याण लोकसभेतील शिवसेना खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांनी मोबाईलवरून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिले.