राष्ट्रवादीकडून नजीब मुल्ला यांचा अर्ज दाखल

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, आरपीआय-आठवले गट, आरपीआय-कवाडे गट या महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने नजीब मुल्ला यांनी सोमवारी, मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.

मुंब्रा कळवा के विकास के लिए नजीब है ना, मी नजीबची लाडकी बहीण या घोषणांचे फलक घेऊन लाडक्या बहिणींनी रॅलीत सहभाग घेतला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते, अल्पसंख्याक महामंडळाचे चेअरमन मुश्ताक अंतुले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आरपीआय (आठवले गट) ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, पीआरपी ठाणे जिल्हाध्यक्ष महेंद्र पवार आदी उपस्थित होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली.

पत्रकारांशी बोलताना नजीब मुल्ला यांनी पाणी प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले. विकास भूखंड अतिक्रमणापासून वाचवून त्याचा विकास करणार, सर्व गोरगरीबांच्या संपर्कात राहून त्यांची कामे करणार, घोषणा कमी करणार, जास्त कृती करुन लोकांची कामे करणार, १५ वर्षे खोटी आश्वासने, कृती शून्य कारभार करणाऱ्यांनी भाजपची खोटी भिती निर्माण केली आहे. कळव्याची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी हायवेला जोडणारा काऊंटर रिंग रुट तयार करणार, विटाव्याच्या पलिकडे नवीन पूल बांधणार, पारसिकच्या मागून नवीन सेवा रस्ता बांधणार आहोत. या मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी आपल्या भावाला, आपल्या मुलाला विजयी करा, असे आवाहन नजीब मुल्ला यांनी केले आहे.