ठाण्याची नगमा पाकिस्तानात ‘सनम’ बनून राहिली !

* प्रियकराला भेटली, लग्न केले आणि ठाण्यात परतली
* पोलिसांकडून चौकशी सुरू

ठाणे : पाकिस्तानची रहिवासी असणारी सीमा हैदर सचिनवरील प्रेमाखातर तिच्या मुलांना घेऊन भारतात आली आणि अन् तिने सचिनशी लग्नगाठ बांधली. तसेच काहीसे घडले आहे ठाण्यात. ठाण्यातील तरूणीची सोशल मीडियावरून पाकिस्तानातील तरूणाशी ओळख झाली. त्यानंतर तिने बनावट कागदपत्र बनवले अन् ही ठाण्यातील तरुणी थेट पाकिस्तानात पोहोचली.

ठाण्याच्या वर्तकनगरमधील नगमा नूर मकसूद अली हिची इन्स्टाग्रामवरून पाकिस्तानमधील तरूणाशी ओळख झाली. हळूहळू या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. मग या दोघांनी भेटायचं ठरवलं. पण हे दोघेही वेगवेगळ्या देशात राहत होते. नगमा नूर मकसूद अली ही ठाण्यात होती तर तिचा प्रियकर पाकिस्तानात… मग नगमाने बनावट कागदपत्रांचा आधार घेतला. नगमाने तिचं नाव बदलत सनम खान केलं. आता सनम खान या नावाने तिने बनावट कागदपत्र तयार केले. पासपोर्ट आणि व्हीजा पण तिने तयार केला. याच कागदपत्रांच्या आधारे ती तिच्या मुलीला घेऊन एबोटाबाद इथं पोहोचली. तिथं जाऊन नगमाने तिच्या प्रियकराशी लग्न केलं.

पाकिस्तानमधील रावलपिंडी या भागात दीड महिने नगमा राहिली. 17 जुलैला पुन्हा भारतात आली. भारतात परत आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. ही तरुणी आल्याचे ठाणे पोलिसांना कळताच त्यांनी या तरुणीला बोलावून चौकशी सुरु केली आहे.

सनमचं याआधीही लग्न झालं होतं, २०१२ मध्ये झालं होतं. माझा पती काहीच करायचा नाही, माझी आई मला पैसे पाठवायची, मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आईसोबत राहिले, पती न्यायला आला नाही. त्यानंतर नातं संपवलं आणि २०१५ मध्ये नाव बदललं.

सनम म्हणाली की, मी नाव २०१५ मध्ये बदललं होतं, पाकिस्तानमध्ये लग्न करण्याचा काही उद्देश नव्हता. २०२१ मध्ये मी तरुणाच्या संपर्कात आले, महिन्याभरात आमची मैत्री झाली. एक दीड वर्षाने लग्नाचा निर्णय घेतला आणि कुटुंबियांशी बोलले. सगळं बोलणं मोबाईलवरून झालं, चॅटिंग, कॉलवर चर्चा झाली. दोन्ही कुटुंबांनी व्हिडीओ कॉलवर चर्चा केली. २०२३ मध्ये पासपोर्ट तयार केला, कागदपत्रे खरी आहेत का? असं विचारलं असता तिने सांगितलं की, मला पोलिसांनी बोलावलं, मी माझी कागदपत्रे दाखवली. आधारकार्डचा नंबर बदलला, फोटो बदलला तर ते खोटं होईल. पण मी फक्त नाव बदललं, फोटो आणि जन्मतारीख तीच आहे. आधारकार्डही मी २०१५मध्ये अपडेट केलं होतं.

पाकिस्तानमध्ये कुठे राहिली? या प्रश्नावर बोलताना सनम खान म्हणाली की, २०२२ मध्ये मी अर्ज केला होता. लग्नासाठी जात होते. चौकशीसाठी ७ ते ८ महिने लागले. चौकशी झाल्यानंतर मला सल्ला दिला गेला की तुम्ही ऑनलाइन लग्न करा. मग मी २४ फेब्रुवारी २०२४ ला लग्न केलं. निकाह पाकिस्तानमध्येही रजिस्टर केला. पूर्ण वैधरित्या नोंदणी करून मी पासपोर्ट घेतला.

सनम म्हणाली की, मी अमृतसरला गेले, तिथून सीमेच्या पलिकडे गेले. पहिल्या गेटवर पासपोर्टची एन्ट्री झाली, तिथून आत गेल्यानंतर सगळी चौकशी केली जाते, सगळं ठीक असेल तर पुढे पाठवतात. पासपोर्ट आणि एन्ट्री झाल्यानंतर बसने बॉर्डर क्रॉस केली. ऑनलाइन लग्न झालं होतं त्यामुळे तिथे जाऊन फक्त रिसेप्शन झालं. कुटुंबियांचे पासपोर्ट नसल्याने ते येऊ शकले नाहीत. भारतात १७ जुलैला आले आणि २१ जुलैला मुंबईत पोहोचले. दोन दिवस दिल्लीत होते, अशी माहिती तिने दिली.