ठाणे: हिरकणी अवघ्या नऊ वर्षाच्या ग्रिहिथा विचारे या ठाणेकर मुलीने ८०० फूट उंचीचा नागफणी कडा सर करून महाराष्ट्र दिनी आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या
लोणावळ्यातील कुरवंडे गावाजवळील नागफणीचा कडा हा ८०० फूट उंचीचा कडा आहे. नागफणीचा कडा हा सदा सर्वकाळ थंडगार सावली आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या उंचीसाठी प्रसिद्ध आहे. नागफणी हा कडा खालचा टप्पा ५०० फूट आणि वरचा टप्पा ३००फूट असा विभागला गेला आहे.
रखरखत्या उन्हात, ४० अंशाच्या तापमानात ग्रिहिथाने १ मे रोजी लोणावळ्यातल्या नागफणी कड्यावरून ३०० फूट रॅपलिंग करत महाराष्ट्राच्या तमाम जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या
1 मे 2024 रोजी पहाटे 6.30 वाजता कुर्वूंडे या बेस व्हीलेज येथून चढाईला सुरुवात केली. सुमारे एक तासाच्या पायपीटीनंतर नागफणीचा माथा गाठला.
कड्याची पूजा करून थोडा वेळ विश्रांती घेऊन मग सुरक्षिततेची साधने परिधान करून रॅपलिंग सुरू केली. ग्रिहिथाने ८०० फूट कड्यावरून १०० फूट खाली रॅपलिंग केल्यानंतर महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणारा फलक हवेत फडकवला. त्यानंतर २०० फूट रॅपलिंग पूर्ण करून ३०० फूट रॅपलिंग पूर्ण केली.
ग्रिहिथाच्या ह्या मोहिमेत ग्रिहिथाचे वडील सचिन विचारे आणि सुप्रसिद्ध टीम महादुर्गचे अक्षय जमदारे, कल्पेश बनोटे, नितेश पाटील, सद्दाम वणवरी, खुशाल बेंद्रे, सुमित जरे, व अश्विनी चौधरी ह्यांनी मोलाची साथ व तांत्रिक मदत पुरवली.