म्युच्युअल फंड – सहकारातून समृद्धीकडे

भारतीय शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सर्वोच्च स्तरावर आहे. गेल्या पाच वर्षात शेअर बाजाराने दिलेल्या परताव्याबद्दल सर्वत्र चर्चा आहे. ऑनलाईन ट्रेडिंग, ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट या गोष्टींमुळे शेअर बाजार हा गुंतवणुकीचा पर्याय सर्वसामान्य माणसांसाठी सहजपणे उपलब्ध झालेला आहे. अनेकजण त्यासाठी शेअर ट्रेडिंगच्या कार्यशाळेत सहभागी होतात. सुरुवातीला काही ट्रेड नफा कमवून देतात. त्याच उत्साहात आणखीन पैसा गुंतवला जातो आणि अचानकपणे शेअर बाजार खाली येतो. आपण गुंतवलेला पैसा एकतर अडकतो किंवा आपल्याला तोटा नोंदवून बाहेर पडावे लागते. मग आपण शेअर बाजारातील गुंतवणूक आपल्यासाठी नाही असा समज करून त्यातून बाहेर पडतो.

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सुरक्षित पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीचे आकडे बघता आणि इन्वेस्ट करण्यातील सहजता बघता हा पर्याय अतिशय लोकप्रिय झालेला आहे. पण इथेही गुंतवणूक करताना मुख्यत्वे परताव्यावर / रिटर्न्सवर लक्ष केंद्रित केले जाते. त्यात सोशल मीडियावर करोडपती कसे बनता येईल याबद्दलच्या व्हिडिओचा पूर आलेला आहे. अमुक एक रक्कम दर महिना गुंतवा आणि करोडपती बना, अमुक रक्कम गुंतवा आणि महिना इतके रिटर्न्स मिळवा असे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर आहेत. हे व्हिडिओ गुंतवणूकदाराला रिटर्न्स ओरिएंटेड गुंतवणूक करण्यास प्रेरित करतात. जी चूक ट्रेडिंगच्या बाबतीत होते तीच याबाबतीतही होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच म्युच्युअल फंड म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे.

म्युच्युअल फंडाच्या कार्यपद्धतीची तुलना एखाद्या हाऊसिंग सोसायटीच्या कार्यपद्धतीशी करता येईल. हाऊसिंग सोसायटीमध्ये सभासद एकत्र येतात, एक ठराविक रक्कम दर महिन्याला काढतात, एक मॅनेजिंग कमिटीमार्फत काम चालवतात. जेणेकरून त्याचा फायदा सर्व सभासदांना मिळेल. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडामध्ये आपल्यासारखे इन्वेस्टर एकत्र येतात, एक कॉर्पस क्रिएट करतात. कॉर्पस एका प्रशिक्षित मॅनेजरकडे विशिष्ट पद्धतीने गुंतवण्यासाठी दिला जातो. गुंतवणुकीतून येणारा परतावा गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात विभागला जातो.

म्युच्युअल फंड प्रामुख्याने तीन प्रकारचे असतात. इक्विटी, हायब्रीड आणि डेट. इक्विटी शेअर्स म्हणजे मालकी हक्क देणारी गुंतवणूक. अर्थात कंपनीला होणाऱ्या नफ्यामध्ये अथवा तोट्यामध्ये त्यांची भागीदारी असते. साहजिकच कंपनीच्या शेअरच्या किमतीमध्ये होणाऱ्या उतार चढावाला सामोरे जावे लागते. ज्या पद्धतीने कंपनी प्रगती करेल त्या पद्धतीने त्याच्या शेअर्सची किंमत बाजारात वाढत जाते. म्हणूनच इक्विटी शेअर्समधील गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणूक असते.

म्युच्युअल फंडांचे कामकाज SEBI आणि AMFI या दोन संस्थांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे होते. प्रत्येक स्कीम ही अप्रूव्ह स्कीम असते. स्कीममध्ये बदल करायचा असल्यास सेबीच्या परवानगीची आवश्यकता असते, तसेच गुंतवणूकदारांना बदलांबद्दल माहिती देणे बंधनकारक आहे. स्कीम डॉक्युमेंटमध्ये दिलेल्या माहितीनुसारच गुंतवणूक केली जाते. तसेच स्कीमचा पोर्टफोलिओ, मॅनेजमेंटचा खर्च, पोर्टफोलिओमध्ये केले जाणारे बदल, स्कीम मॅनेजर बद्दलची माहिती, एन्ट्री बद्दलचे आणि पैसे काढून घेण्यासंबंधीचे नियम ही माहिती स्कीम डॉक्युमेंटमध्ये उपलब्ध असते. थोडक्यात कोणत्याही म्युच्युअल फंड स्कीमचे कामकाज नेमून दिलेल्या चौकटीतच करावे लागते. स्कीम मधील जोखीमेची कल्पना देण्यासाठी रिस्कोमिटर नावाचा कॉलम असतो. त्यामुळे म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही सुरक्षित असते.

इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये अनेक प्रकारच्या स्कीम्स असतात. जसे लार्जकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप, फ्लेक्सिकॅप, मल्टी कॅप, इंडेक्स फंड इत्यादी. प्रत्येक स्कीमची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी वेगळी असते. सेबीने (SEBI) या स्कीम्सच्या वर्गीकरणाचे नियम घालून दिलेले आहेत. प्रत्येक प्रकारांमधील जोखीमही वेगवेगळी असते. आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेप्रमाणे आणि गुंतवणुकीच्या कालावधीला अनुसरून योग्य ती स्कीम निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्कीमची तुलना करायची असल्यास ती तुलना त्याच प्रकारच्या स्कीम्सशी करणे योग्य आहे. लार्जकॅप स्कीमची तुलना मिडकॅप अथवा स्मॉलकॅप स्कीमशी करणे चुकीचे ठरेल.

गुंतवणूकदारांनी सजगपणे या उपलब्ध माहितीचा अभ्यास करून योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. यासंदर्भात गुंतवणूक विशेषज्ञाचे मार्गदर्शन फायदेशीर ठरते. कारण सजग गुंतवणूकदार हाच हुशार गुंतवणूकदार असतो.

क्रमशः
mutualmudra@gmail.com
whatsup: 9892293215