राष्ट्रकुल स्पर्धेतून माघारीचा परस्पर निर्णय अयोग्य!

पुढील वर्षी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेण्यापूर्वी ‘हॉकी इंडिया’ने केंद्र शासनाशी चर्चा करणे अनिवार्य होते, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त करतानाच राष्ट्रीय हॉकी संघटनेला फटकारले आहे. करोनाची चिंता आणि ब्रिटनच्या भारतासंदर्भातील विलगीकरण नियमातील भेदभावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे ‘हॉकी इंडिया’ने काही दिवसांपूर्वी सांगितले. मात्र, त्यांचा हा निर्णय ठाकूर यांना पटलेला नाही.

‘‘कोणत्याही राष्ट्रीय संघटनेने अशा प्रकारची विधाने करण्यापूर्वी सरकारशी चर्चा करणे गरजेचे आहे. हा केवळ एका संघटनेचा संघ नसून देशाचा हॉकी संघ आहे हे विसरता कामा नये. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तुमच्याकडे केवळ १८ खेळाडू नाहीत. राष्ट्रकुल ही जागतिक स्तरावरील स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेबाबतचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ‘हॉकी इंडिया’ने सरकार आणि क्रीडा मंत्रालयाशी चर्चा करणे अनिवार्य आहे,’’ असे ठाकूर म्हणाले.

बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रकुल स्पर्धा होणार असून त्यानंतर हँगझोऊ येथे १० ते २५ सप्टेंबर या दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धा होईल. या दोन स्पर्धांमध्ये केवळ ३२ दिवसांचे अंतर असल्याने भारतीय संघ राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार नसल्याचे हॉकी इंडियाकडून सांगण्यात आले होते. मात्र, भारताकडे प्रतिभावान हॉकीपटूंची कमतरता नसल्याचे ठाकूर म्हणाले.

‘‘भारताकडे चांगले हॉकीपटू मोठ्या संख्येने आहेत. क्रिकेटमध्ये, सध्या ‘आयपीएल’ सुरू असून काही दिवसांत ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. क्रिकेटपटू जर काही दिवसांच्या कालावधीत सलग दोन स्पर्धा खेळू शकतात, तर इतर खेळांमधील खेळाडूंनाही हे नक्कीच शक्य आहे,’’ असे ठाकूर यांनी नमूद केले.