चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला अटक

कल्याण : नऊ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना पंधरा दिवसापूर्वी महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या घटनेचा कसून तपास करत महात्मा फुले पोलिसानी यातील आरोपीला बुधवारी रात्री अटक केली आहे.

हा आरोपी गेल्या महिन्यातच पोक्सो अंतर्गत १० वर्षाची शिक्षा भोगून बाहेर आला होता. १५ दिवस उलटत नाही तोच आरोपीने पुन्हा तेच कृत्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सुरज शंकर सिंग उर्फ वीरेंद्र शंकर मिश्रा (३२) हा आरोपी मुळचा मध्यप्रदेश येथील राहणारा असून सध्या भिवंडी येथील सोनाळे परिसरात राहत होता. बाललैंगिक अत्याचार केल्याने १० वर्षांचा तुरुंगवास भोगणाऱ्या सूरज उर्फ विरेंद्रची १४ नोव्हेंबरला तुरूंगातून सुटका झाली होती. त्यानंतर नव्याने आयुष्य सुरू करायचे सोडून फिरस्ता असणाऱ्या विरेंद्रची नजर कल्याण येथील स्टेशन परिसरातील एका इमारतीच्या खालील फुटपाथवर झोपणाऱ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर पडली. आपल्या बाबांच्या कुशीत सुरक्षित झोपलेल्या चिमुरडीला त्याने हळूच उचलून बाजूला केले. त्यानंतर या चिमुरडीला काही अंतरावर नेत त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिच्या गळ्यावर चाकूने वार करत तिचा निर्दयपणे खून केला.

या प्रकरणाची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिसांनी धाव घेत जागेची पाहणी करत तपासाला सुरुवात केली. यासंदर्भात त्यांनी एका संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. मात्र तपासाचा वेग वाढल्यानंतर हे कृत्य करणारा तरुण वेगळा असल्याचे त्यांचा लक्षात आले. सीसीटीव्हीचा आधार घेत त्याने या गुन्ह्याला जबाबदार असणाऱ्या सूरज उर्फ विरेंद्रचा कसोशीने शोध घेतला. त्याचा शोध घेण्यासाठी महात्मा फुले पोलिसांनी विविध १० पथके तयार केली होती. यावेळी त्याचे मूळगाव असणाऱ्या मध्य प्रदेशात पोलिसांनी एक पथक पाठवले होते तर भिवंडी येथील सोनाळे गावात एक पथक पाठवले होते.

सूरज उर्फ विरेंद्रला सोनाळे गावातुनच अटक केल्याची माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली. विशेष म्हणजे या सोनाळे परिसरातील बकरीच्या गोठ्यात जाऊन अंधाराचा फायदा घेत त्याने बकरीवर देखील अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येता त्यांनी सुरज याला चांगलाच चोप दिल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच सुरज याने विकृतपणाचा कळस गाठल्याचे समोर आले आहे.

अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलीस ठाणाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने, पोनि (गुन्हे) प्रदिप पाटील, सपोनि श्रीनिवास देशमुख, दिपक सरोदे, देविदास ढोले, पोउनि सागर चव्हाण, तानाजी वाघ, संजय जगताप, ज्ञानेश्वर वाघमारे आदींसह महात्मा फुले चौक पो.स्टेचे सपोनि घोलप, मुंढे, चव्हाण व पथक बाजारपेठ सपोनि आंधळे व खडकपाडा, सपोनि. बोचरे व पथक नेमणुक कोळसेवाडी पो.स्टे. सपोउनि भालेराव, पोह निकाळे, भालेराव, जाधव, भोईर, भावसार, भाट, तडवी, ठिकेकर, मोरे, कांगरे, पोना चौधरी, भोईर, मधाळे, पोशि बरफ सोंगाळ गामणे, वाळींबे, निसार, पिंजारी, हासे, थोरा आदींनी अथक परिश्रम घेत गुन्ह्याचा शोध घेण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.