भांडणाचा राग मनात ठेवून चार वर्षीय मुलाची हत्या

उल्हासनगर : अंबरनाथ येथील ऑर्डनन्स फॅक्टरी वसाहतीमध्ये काही दिवसांपूर्वी ४ वर्षीय मुलाचे शव आढळून आले होते. या मुलाची हत्या झाल्याचे आता निष्पन्न झाले आहे. मयत मुलाची आई व त्याच्या शेजारी राहणाऱ्या कांचनसिंग उर्फ कांचन ब्रिजराज पासी ( २४ ) याचे भांडण झाले होते. हा राग मनात ठेवून पासीने ही हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

उल्हासनगर -२ येथील हनुमाननगर परिसरात गुड्डन अमरसिंग ठाकुर ( ३६ ) ही महिला तिचा पती व मुलांसह राहते. घरासमोर खेळत असतांना २० एप्रिल २०२२ रोजी ठाकूर हिचा ४ वर्ष ८ महिने वयाचा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार उल्हासनगर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. दरम्यान अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑर्डनन्स फॅक्टरी वसाहतीत एका अज्ञात मुलाचे शव आढळून आले होते. पोलिसांनी पंचनामा करून मयत मुलाची ओळख पटवण्यासाठी शोध सुरू केला होता . हे शव ठाकूर यांच्या मुलाचे असल्याचे निष्पन्न झाले

गुन्हयातील फिर्यादी ठाकूर यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांच्या शेजारी राहणारा त्यांच्या ओळखीचा इसम कांचनसिंग उर्फ कंचन ब्रिजराज पासी, मुळपत्ता- ग्राम पिपराहता, पोस्ट बिधारा उस्मानपुर, जि. कौशंबी, राज्य उत्तरप्रदेश याच्याशी किरकोळ भांडण झाले होते, अशी माहिती दिली होती. पोलिसांना कांचन सिंगचा या प्रकरणात संशय आला होता व त्यावरून त्यांनी कांचनसिंगचा शोध सुरू केला असता तो त्याच्या मूळ गावी पवन एक्सप्रेसने जात असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिता राजपुत पोलीस कर्मचारी विष्णु मोगरे,  लक्ष्मण पांढरे, चंद्रहास बोरसे यांचे पथक तत्काळ रवाना झाले आणि त्यांनी त्यास प्रयागराज छीवकी रेल्वे स्टेशन, उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेऊन उल्हासनगर पोलीस ठाणे येथे आणले. त्याचेकडे सखोल तपास केला असता, त्याने सदर गुन्हयाची कबुली दिली. गुन्ह्यातील अपहृत बालकास स हनुमान नगर उल्हासनगर २ येथून आईस्क्रीम देवून त्याला ऑडनन्स फॅक्टरी वसाहत अंबरनाथ  ( प ) येथे नेले. तेथे त्याचा गळा दाबुन त्यास जिवे ठार मारले असल्याचे आरोपीने सांगितले आहे.

आरोपीस अटक करून त्यास न्यायालयाने ३० एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. सदरची कारवाई डॉ. सुधाकर पठारे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-४, उल्हासनगर,  मोतीचंद राठोड, सहा. पोलीस आयुक्त, उल्हासनगर विभाग, राजेंद्र कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उल्हासनगर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रहार गोडसे हे करीत आहेत.