मुरबाडमधील नऊ वर्षीय बालकाच्या हृदयावर दुर्मिळ शस्त्रक्रिया

मुंबई- मुरबाड येथील जन्मजात हृदयविकार असलेल्या नऊ वर्षाच्या एका मुलावर यशस्वीरित्या शल्यचिकित्सा करून त्याचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.

मुरबाड येथे राहणारा चिन्मय याला जन्मजात हृदयविकार होता. जन्माच्या वेळी चिन्मयचे वजन एक किलो होते. मुरबाड येथे ग्रामीण भागात राहत असल्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती, त्यामुळे चिन्मयवर पुढील उपचार झाले नाहीत. चिन्मयला बोलताना  व चालताना धाप लागायची तेव्हा त्याचे पालक स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन जायचे परंतु वयाच्या नवव्या वर्षापर्यँत हृदयविकारावर त्यावर उपचार झाले नव्हते. अशातच एकदा त्याच्या मामाची भेट तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे बाल हृदय शल्यचिकित्सक डॉ. भूषण चव्हाण यांच्याशी भेट झाली व या आजाराची माहिती त्यांना देण्यात आली. डॉ. भूषण चव्हाण यांनी तत्काळ त्याला तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर येथे भरती करून वैद्यकीय चाचण्या केल्या.

याविषयी अधिक माहिती देताना डॉ. भूषण  चव्हाण सांगतात, चिन्मयच्या  हृद्यात दोन समस्यां होत्या. पहिली म्हणजे एओर्टिक आर्च ही रक्तवाहिनी असते जी शरीराला शुद्ध रक्तपुरवठा करते. ती रक्तवाहिनी दोन भागांमध्ये विभागली होती. त्यामध्ये कनेक्शन नव्हते. या  समस्येला आम्ही एओर्टिक आर्च इंटरपशन म्हणतो व या रक्तवाहिनीला असलेला जो मुख्य वॉल्व्ह असतो तो संकुचित झाला होता. ही दुसरी समस्या होती. अशा समस्यांमध्ये मोठी सर्जरी करण्यात येते, परंतु चिन्मयचे वय लक्षात घेता आम्ही ही शस्त्रक्रिया बिनटाक्याची करावयाची ठरवली. व अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी अनेक वैद्यकीय बाबी तपासून पहाव्यात लागतात कारण अशा केसेसमध्ये मृत्यूचा धोका अधिक असतो. पायातून वायर टाकून स्टेण्ट टाकून हृदयातील दोन्ही समस्या सोडविण्यात आल्या. ही शस्त्रक्रिया सलग दोन तास चालली. वैद्यकीय क्षेत्रामध्ये हि सर्वात कठीण शल्यचिकित्सा मानली जाते. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमधील १० जणांची टीमने ही शल्यचिकित्सा केली. अत्यंत जोखमीची असलेली हि शस्त्रक्रिया नवी मुंबईतील एक दुर्मिळ शस्त्रक्रिया मानली जाते.