व्यावसायिक वापरामुळे क्रीडाप्रेमी मैदानापासून वंचित
ठाणे : मुलांना खेळण्यासाठी शहरात मैदानेच उरली नसताना आता ठाणे महापालिकेचे अतिशय जुने गावदेवी मैदान देखील खाजगी संस्थांना आंदण दिले असल्याचे उघड झाले आहे. खासगी कार्यक्रमांमुळे मैदान मुलांना खेळण्यासाठी उपलब्धच होत नसल्याने क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील पार्किंगची जटिल समस्या सुटावी यासाठी पालिकेच्या वतीने विविध ठिकाणी पार्किंगचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये गावंदेवी येथील भूमिगत पार्किंगचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात आला असून ७०० चौरस मीटरवर हे बांधकाम करण्यात आले आहे. त्यानुसार या ठिकाणी १३० चारचाकी आणि १२० दुचाकी पार्क करता येणार आहेत. या ठिकाणी गाडी पार्क करण्यासाठी शुल्क आकारण्यात येत असून हे काम देखील एका खाजगी संस्थेला देण्यात आले आहे.
भूमिगत पार्किंगसाठी २७ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. याशिवाय ठाणेकरांना या ठिकाणी रात्रीचे पार्कीग देखील करता येणार आहे. भूमिगत पार्किंगचा प्रकल्प राबवण्यापूर्वी केवळ खेळाचे मैदान असल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी क्रीडाप्रेमी खेळायला येत होते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अतिशय जुने असे हे मैदान असून पार्किंग प्रकल्पामुळे मैदानाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये अशी मागणी पर्यावरण प्रेमी आणि क्रीडा प्रेमींनी ठाणे महापालिकेकडे केली होती. त्यानुसारच हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. एकीकडे भुमिगत पार्कीगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून दुसरीकडे मैदानही पूर्वीप्रमाणे क्रिडा प्रेमींसाठी खुले करण्यात आले आहे. या ठिकाणी मातीचा भराव टाकून पूर्वीसारखे मैदान खेळण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे.
मैदान क्रीडाप्रेमींसाठी खुले करण्यात आले असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात येत असला तरी या मैदानाचा जास्त वापर या खाजगी संस्थाच करत असून पालिकेने देखील हे मैदान खाजगी संस्थांना आंदण दिले असल्याचे उघड झाले आहे. या ठिकाणी अनेकवेळा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याने या मैदानात मुलांनी कधी खेळायचे असा प्रश्न मुलांना पडला आहे. हे मैदान खाजगी संस्थांना भाड्याने देऊन पालिका गडगंज भाडे वसूल करत असल्याचा आरोप करण्यात येत असून जनआंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुक्तांना दिला आहे.