मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
बदलापूर : राज्यातील नगर पालिकांमधील अभियंता संवर्गातील राज्य शासनाच्या इतर विभागांप्रमाणे वेतनश्रेणी व राजपत्रित दर्जा मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद अभियंता संघाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वरे केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील अ, ब, क वर्ग नगरपालिकांमधील अभियंता संवर्गातील राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या इतर विभागाप्रमाणे चेतनश्रेणी व राजपत्रीत दर्जा मिळणेसाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद अभियंता संघ या संघटनेने शासनाकडे सन २०११ पासुन मागणी कलेली आहे. या मागणीबाबत संघटनेने मा. मुंबई न्यायालयात याचिका क्र. ३४२/२०१९ दाखल केलेली होती. या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने शासनास सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश २८/६/२०१२ रोजी दिलेले आहेत.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य नगरपरिषद अभियंता संघाचे अध्यक्ष संजय कुंभार यांनी माजी नगरविकास राज्यमंत्री आमदार कालीदास कोळंबकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नगर पालिकांमधील अभियंत्यांवर वेतनश्रेणी राजपत्रित दर्जाबाबत होत असलेल्या अन्यायाबाबत वस्तुस्थिती समजावून सांगितली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकदृष्टया निर्णय घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती संजय कुंभार यांनी दिली.
या निर्णयाचा राज्यातील विविध नगर पलिकांतील १०४८ अभियंत्यांना लाभ होणार असून लवकरच यासंदर्भातील कार्यवाही होईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर त्यांनी कालीदास कोळंबकर आणि मुख्यमत्र्यांचे आभार मानले आहेत.