क्रिकेट प्रशिक्षणासाठी मुंबईची पायपीट संपणार

मुंबई क्रिकेट असोसिएशनला मुंब्र्यातील भूखंड

ठाणे: क्रिकेटमध्ये करिअर करण्याची इच्छा बाळगणाऱ्या कळवा, मुंब्रा, शीळसह ठाण्यातील क्रिकेटपटूंना एमसीएच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईला जाण्याची गरज नाही. ठाणे महापालिकेने मुंबई क्रिकेट असोसिएशनला मैदानासाठी आरक्षित मुंब्र्यातील भूखंड नाममात्र भाड्याने दहा वर्षांसाठी देण्याचा प्रस्ताव प्रशासकीय सभेने मंजूर केला आहे.

ठाण्यातून आजवर अनेक क्रिकेटपटू भारतीय संघाला मिळाले आहेत तर अनेक खेळाडू जिल्हा आणि राज्य पातळीवरील स्पर्धांमध्ये चमकत आहेत. येथे होणाऱ्या एन. टी केळकर, ठाणेवैभव करंडक आदी स्पर्धांमधून शेकडो क्रिकेटपटूंना मोठे व्यासपीठ मिळत आहे. मात्र कळवा, मुंब्रा, दिवा, शिळ आदी भागातील क्रिकेटपटूंना मैदान आणि योग्य मार्गदर्शनाअभावी संधी मिळत नाही. मात्र महापालिकेने मुंबई क्रिकेट असोसिएशनला मुंब्र्यातील एक आरक्षित भूखंड भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेतल्याने या क्रिकेटपटूंना ठाण्यातच करिअर घडवण्याची संधी मिळणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनला हा भूखंड मिळाल्यास ठाणे, मुंब्रा-शिळ-कौसा येथील खेळाडूंना फायदेशीर ठरेल. हा उपक्रम ठाण्यात सुरु झाल्यास खेळाडूंना मुंबई येथे जावे लागणार नाही. त्यांचा प्रवास व वेळ वाचेल. मुंबई क्रिकेट असोसिएशन ही संस्था ना नफा ना तोटा या धर्तीवर हा प्रकल्प राबविणार असून ते कोणत्याही प्रकारचा शुल्क न आकारता ठाणेकरांसाठी सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या जागेची आणि त्यामधील प्रकल्पाची निगा देखभाल, इतर सर्व खर्चही संस्था करणार आहे. त्याकरिता ठाणे महापालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही, असेही पालिकेने प्रस्तावात स्पष्ट केले आहे.

महापालिका दहा वर्षांसाठी हा भूखंड मासिक भाडे आकारुन देणार आहे. परंतु या १० वर्षांत पहिल्या पाच वर्षात सदर भाडेपट्टाधारकाची समाधानकारक कामगिरी विचारात घेऊन उर्वरीत पाच वर्षांकरिता भाडेपट्टा कालावधी वाढवून देण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या शाळांमधील शिफारस केलेल्या इच्छुक २० खेळाडूंना विनामूल्य प्रशिक्षण देणे संस्थेस बंधनकारक राहणार असल्याची बाब पालिकेने प्रस्तावात नमूद केली आहे.