चिखलामुळे मुंबई-नाशिक महामार्ग पुन्हा थांबला

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्ग पुन्हा एकदा बुधवारी रस्त्यावर पडलेल्या चिखलाने रोखून धरला आहे. ही घटना सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली. तातडीने रस्त्यावर पडलेल्या चिखलावर पाण्याचा मारा करून चिखल रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर जवळपास अर्धा तासांनी वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.

मुंबईकडून नाशिककडे एका अनोळखी ट्रकमधून चिखल घेऊन जाताना बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास त्या ट्रकमधील चिखल माजिवाडा ब्रीज जवळ, ऋतू बिझनेस पार्क समोर, मुंबई-नाशिक महामार्गावर पडल्याची माहिती समजताच कापूरबावडी वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक थांबवून रस्त्यावर पडलेल्या चिखलावर अग्निशमन दलाच्या फायर वाहनातील होज पाईपच्या मदतीने पाण्याचा स्प्रे मारून चिखल रस्त्याच्या बाजूला करण्यात आला. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून मुंबई-नाशिक महामार्ग त्यानंतर सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात आल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली. तर ही गेल्या पंधरा दिवसातील मुंबई नाशिक महामार्गावरील दुसरी घटना असल्याचे समजते.