मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला भारतात आणले

नवी दिल्ली: मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले आहे. एनआयएचे आयजी बत्रांच्या नेतृत्वात विशेष पथक राणाला घेऊन भारतात आले आहे. आता तहव्वूर राणाची एनआयए मुख्यालयात चौकशी होणार आहे. मुंबई हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या तहव्वूर राणाला 2009 साली अमेरिकेत अटक करण्यात आली होती.

अमेरिकन कोर्टाने अनुमती दिलेल्या कलमांनुसारच तहव्वूर राणावर खटला चालवण्यात येणार आहे. अमेरिकेत खटला चालला असताना भारतात पुन्हा खटला का चालवता? असा सवाल तहव्वूर राणानं केला होता. मात्र भारताने राणाचा दावा खोडून काढत आंतरराष्ट्रीय कायद्यांचा दाखला दिला. सोबतच राणावरील आरोप गंभीर असल्याने भारतातही खटला चालवू शकतो असा दावा भारत सरकारच्या वकिलांनी अमेरिकन कोर्टात केला होता.

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचे इस्रायलकडून स्वागत करण्यात आले आहे.

तहव्वूर राणा भारतात आणण्यात आल्यानतंर पाकिस्तानने मात्र राणापासून हात झटकले आहेत. राणा हा कॅनडाचा नागरिक आहे, त्याचा पाकिस्तानशी आता संबंध नाही, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. राणाने गेल्या दोन दशकांपासून त्याच्या पाकिस्तानशी संबंधित कागदपत्रांचे नूतनीकरण केले नसल्याचा दावाही पाकिस्तानने केला. राणाच्या चौकशीतून पाकिस्तानचा पर्दाफाश होईल, असे कायदेतज्ज्ञ बोलत आहेत. पण त्याआधीच पाकिस्तानने राणापासून फारकत घेतल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, तहव्वूर राणाला आझाद मैदानात सार्वजनिकरित्या फाशी द्या, अशी मागणी शहीद तुकाराम ओंबळेंचे भाऊ एकनाथ ओंबळेंनी केली आहे. कसाबला फाशी देण्यास विलंब झाला, यावेळी तसे करू नका, अशी मागणीही एकनाथ ओंबळे यांनी केली.