मोघरपाडा येथे साकारणार ‘मुगल उद्यान’

आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील घोडबंदर येथील मोघरपाड्यात उपलब्ध आरक्षित भूखंडावर पुणे शहराच्या धर्तीवर ‘मुगल उद्यान’ निर्माण केले जाणार आहे. या उद्यानात सरखेल कान्होजी आंग्रे यांचे आरमार व त्यांची माहिती देण्यात येणार आहे. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ही योजना साकारणार आहे.

मुगल उद्यान निर्मितीसाठी राज्य सरकारने पाच कोटीचा निधी मंजूर केला आहे. याबाबत अधिक माहिती देताना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, हे मुगल उद्यान घोडबंदर रोडवरील मोघरपाडा येथील महापालिकेच्या १० हजार चौरस मीटरच्या उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर तयार केले जाणार आहे. या उद्यानात सरखेल कान्होजी आंग्रे यांचे आरमार व त्यांची माहिती देण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील खाडी किनाऱ्याचा वापर पोर्तुगीज काळापासून होत होता. आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी झाला. सन १६९८ ते सन १७२९ या काळात ते आरमार प्रमुख महणून काम पाहत होते. त्यांनी ब्रिटीश, डच आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले होते. सरखेल कान्होजी आंग्रे यांचा बोटी बनविण्याचा कारखाना होता. त्यांचे सुरतेपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत समुद्रातील आरमारावर अनिर्बंध वर्चस्व होते. ४ जुलै १७२९ मध्ये कान्होजी आंग्रेंचा मृत्यू झाला. त्यांची समाधी अलिबाग येथे आहे. त्याचे ऐतिहासिक महत्व पुसले जाऊ नये व नवीन पिढीला त्याचे महत्व कळावे यासाठी महापालिकेच्या आरक्षित उद्यानाच्या भूखंडावर सरखेल कान्होजी आंग्रे यांचे आरमार व त्यांची माहिती देण्यात येणार आहे, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.

अशी असेल ‘मुगल बाग’

ठाणे शहरात होणारे ‘मुगल गार्डन’ हे अशा प्रकारचे उद्यान असेल तिथे रंगीबेरंगी फुले असतील. विविध प्रकारची फुले व फळझाडे यांचा सुरेख संग्रह असेल. जुन्या मुगल शैलीत, ऐतिहासिक शैलीचा ‘टच’ देऊन ते तयार करण्याचे नियोजन आहे. उद्यानाच्या कामात इतिहासाची जोड, विद्यार्थी-तरुणांना त्या फुलझाडांची माहिती आणि सर्व वयोगटातील नागरिकांना हक्काचे निवांत क्षण घालविण्यासाठी जागा हा यामागील हेतू आहे. दिल्ली व देशाच्या इतर काही भागात अशा प्रकारची मोठमोठी उद्याने आहेत.