भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने संकल्प पत्र प्रसिद्ध केले असून पाईपद्वारे स्वस्त गॅस, पुढील पाच वर्षे मोफत शिधावाटप यासह शेतकरी, तरुणवर्ग, महिला, लघु उद्योजक, अशा सर्वच घटकांसाठी आकर्षक योजनांचा समावेश यात करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
भाजप मुख्यालयात हा कार्यक्रम पडला असून यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर दिग्गज नेते उपस्थित होते. या जाहीरनाम्यात रोजगाराच्या संधी, महिला सक्षमकरण आणि शेतकरी यांच्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या जाहीरनाम्यानुसार पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतील. जन औषधी योजनेचा विस्तार केला जाईल, असंही पंतप्रधान मोदी यांनी संबोधन करताना सांगितलं आहे.
जाहीरनाम्यानुसार रोजगार आणि उद्योजकतेवर भर देण्यात येणार आहे. मोफत रेशन योजना पुढील पाच वर्ष सुरु राहणार आहे. आयुषमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत विमा आणि मोफत उपचार, तसेच 70 वर्षांवरील वृद्धांना आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. तृतीयपंथीयांना देखील या योजनेत सामावून घेतले जाणार आहे. गरीबांसाठी तीन कोटी घरे बांधण्यात येणार आहेत. पाईपमार्फत स्वस्त गॅस घराघरात पोहोचवले जाणार आहे.
वीजबिल शून्य करण्यासाठी काम करण्यात येणार असून वीजेपासून कमाईच्या संधी निर्माण करण्यासाठी काम करण्यात येणार आहे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना लागू करण्यात येणार आहे. गरीबांसाठी अनेक योजनांचा विस्तार करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष देऊन देशात फूड प्रोसेसिंग हब बनवण्यात येणार आहे. त्याच बरोबर नॅनो युरियाच्या वापरावर भर, महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न, सर्व्हायकल कॅन्सरच्या उपचारावर भर, तीन कोटी महिला लखपती दिदी, महिला बचत गटांना माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन या क्षेत्रात प्रशिक्षण, मुद्रा योजना 10 लाखांवरून 20 लाख अशा योजनांचा संकल्प पत्रात समावेश आहे.