ठामपा अधिकाऱ्यांना गुलाब देऊन दिव्यांगांचे आंदोलन

प्रजासत्ताक दिनी करणार अर्धनग्न आंदोलन

ठाणे: दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार निवेदन देऊनही ठाणे महापालिका प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जात नसल्याने अखेर सोमवारी अखिल भारतीय दिव्यांग सेनेच्या वतीने पालिकेतील समाज कल्याण अधिकाऱ्यांना गुलाब देण्यात आले. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अर्धनग्न आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

ठाणे शहरातील दिव्यांगांनी आपला उदरनिर्वाह करण्याबाबत व्यवसायासाठी स्टाॅल देण्याचे अर्ज केले आहेत. मात्र, त्यांना अद्याप स्टॉल टपरी, गाळे उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. अनधिकृत बांधकाम धारकांकडून आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई न करता स्वतःच्या आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सुरु करण्यात आलेले दिव्यांगांचे स्टॉल तोडत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ठाणे महानगर पालिकेकडून दिव्यांग विकास निधीचा विनियोग केला जात नाही. यासाठी वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर सोमवारी पालिका मुख्यालयात जाऊन दिव्यांग बांधवांनी पालिका अधिकाऱ्यांना गुलाब देऊन गांधीगिरी केली.