ग्रिहिथाच्या विक्रमांना माउंट युनामने दिली हुलकावणी

ठाणे: गिरियारोहणातील नव नवीन विक्रम केलेली ठाण्याची हिरकणी नऊ वर्षांची ग्रिहिथा विचारे हिला यंदा मात्र माउंट युनाम मोहिमेने निराश केले. प्रतिकूल वातावरणामुळे आणि प्रकृतीने साथ न दिल्याने तिला ही मोहीम अर्धवट सोडावी लागली. मात्र लवकरच येथे येऊन ६,११० मिटर उंचीवर तिरंगा फडकवण्याचा निश्चय तिने केला आहे.
माउंट किलीमांजारो, आफ्रिका, नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प, मलेशिया येथील माउंट किनाबालू शिखर तसेच सह्याद्रीतील वजीर सुळका, नवरा-नवरी सुळका, स्कॉटिश कडा, कळकराई सुळका, डांग्या सुळका असे अनेक कठीण ट्रेक सर करून अनेक विक्रम ग्रिहिथाने केले आहेत.
अशाच एका नवीन विक्रमाच्या दिशेने जात असताना ग्रिहिथाला अपयशाचा सामना करावा लागला. माउंट युनाम हे हिमाचल प्रदेश येथील बारालाचा पासपासून काही किलोमीटर पुढे झांस्कर पर्वत रांगांमध्ये ६११० मीटर उंचीचे एक पर्वत आहे. ते मनाली पासून १५५ किमी पुढे आणि २५० किमी पुढे लेह आहे.
चारही बाजूने बर्फाने झाकलेले उंचच उंच डोंगर, थंडच थंड हवा, निर्मनुष्य वस्ती आणि -१० डिग्री तापमान, त्यातही हिमवृष्टी झाली की तापमान अजून खाली जाते.
ग्रिहिथाने तिच्या ह्या मोहिमेची सुरुवात मुंबईतून २७ मे ला, मुंबई ते चंदिगढ विमानाने आणि पुढे चंदिगढ ते मनाली हा नऊ तासांचा रस्त्याने प्रवास केला. २८ मे ला भ्रिगु लेकच्या मार्गावर ॲक्लीमॅटीझेशन वॉक करून २९ तारखेला पहाटे चार वाजता मनालीवरून मोहिमेची सुरुवात केली. पुढे रोहतांग, अटल बोगदा पार केल्यावर काही किलोमीटर अंतरावर बर्फवृष्टीमुळे रस्ता बर्फाने बंद झाल्यामुळे एक रात्र धारचा इथे राहावे लागले.
३० मे ला प्रवास पुन्हा सुरू करून भरतपूर बेस कॅम्पला पोहचून पुन्हा एकदा ॲक्लीमॅटीझेशन वॉक करून रात्री मुक्काम केला. रात्री झालेल्या बर्फवृष्टीमुळे तापमान अजून खाली गेले होते.
५०५० मीटर उंचीवर पोचून ५२०० मीटर समिट बेस कॅम्प गाठण्याआधीच पायाच्या दुखापतीमुळे आणि खराब हवामानामुळे ग्रिहिथाला १ तारखेला खाली बेसकँपला यावे लागले.
ग्रिहिथाला भरतपूरवरून लगेच मनाली येथे आणण्यात आले, जेथे ती आता बरी असून आराम करत आहे. ४ तारखेला मुंबईकडे ती प्रयाण करणार आहे.
मी युनामला पुन्हा येईन आणि ६११० मीटर उंचीवरून भारताचा तिरंगा फडकवीन, असा आत्मविश्वास तिने व्यक्त करून भरतपूर बेसकॅम्प सोडले.
ग्रिहिथाची ही मोहीम फत्ते झाली असती तर ती भारतातील सर्वात कमी वयाची माउंट युनाम सर करणारी पहिली गिर्यारोहक ठरली असती. आणि पुन्हा एकदा भारतीय स्त्रियांना काहीही अशक्य नाही हे सिद्ध केले असते.