ठाणे : प्रवाशांना शिस्तबद्ध सेवा देत असतानाच प्रसंगावधान राखून प्रवाशांचे प्राण वाचवणारे मोटरमन खरे जीवरक्षक ठरले आहेत. मागील पाच महिन्यांत या रेल्वे कर्मचाऱ्यांनी १२जणांचे प्राण वाचवले आहेत.
दिवा-ठाणे धीम्या मार्गावर रुळाच्या मध्यभागी एक ५६ वर्षांची महिला अचानक ट्रेनसमोर उभी राहिली. त्यावेळी मोटरमन जी.एस. बिस्ट यांनी तत्काळ आपत्कालीन ब्रेक लावले. महिलेपासून काही मीटर अंतरावर ही गाडी थांबल्याने तिचा जीव वाचवला. बिस्ट यांनी तिला दोन महिला प्रवाशांच्या मदतीने रुळावरून हटवले आणि ठाण्यापर्यंत ट्रेनमध्ये नेले. तिला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. ३१ ऑगस्ट रोजी मुंबई विभागाचे मोटरमन संजयकुमार चौहान ठाणे-अंबरनाथ लोकल चालवत होते. किमी 33/122 येथे एक व्यक्ती ट्रेनसमोर रुळावर पडलेली दिसल्यामुळे त्यांनी तत्काळ आपत्कालीन ब्रेक लावला. गाडी थांबल्यानंतर तो माणूस उठला आणि रुळावरून निघून गेला.
मोटरमन एस. व्ही. जाधव यांनी छशिमट ते ठाणे येथे कर्तव्यावर असताना, एक मुलगी चिंचपोकळी ते भायखळा अप लोकल मार्गादरम्यान रुळावर येताना दिसली. जाधव यांनी लगेचच काही फूटांवर ट्रेन थांबवून मुलीचा जीव वाचवला. आरपीएफ कर्मचा-यांनी त्या मुलीला रुळावरून बाहेर काढले. मोटरमन राम शब्द अंबरनाथ ते छशिमट या मार्गावर काम करताना एक २० वर्षांचा मुलगा चिंचपोकळी स्थानकात प्रवेश करताना दिसला. त्याने रुळाच्या मध्यभागी उडी मारली आणि लोकलसमोर उभा राहिला. राम शब्द यांनी तत्काळ आपत्कालिन ब्रेक लावल्यामुळे लोकल थांबली आणि युवकाचा जीव वाचला. अशा जीव वाचवण्याच्या १२ घटनांपैकी चार जीव वाचवण्याच्या घटना ऑगस्टमध्ये, जुलैमध्ये दोन, तीन घटना जूनमध्ये, मेमध्ये दोन आणि एक घटना एप्रिलमध्ये झाली.