देवेंद्र फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मंजूर

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या महायुती सरकारवर विधानसभेत विश्वास दर्शक ठराव सादर करण्यात आला. तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला आहे.

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या अंतिम दिवशी सोमवारी (9 डिसेंबर) दुपारी हा ठराव मांडण्यात आला. शिवसेनेचे आमदार उदय सामंत, भाजपाचे आमदार संजय कुटे, रवी राणा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी हा प्रस्ताव सादर केला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे, असा एक ओळीचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. राज्यातील 288 पैकी 132 जागा या एकट्या भाजपाला मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, महायुतीकडे मोठ्या प्रमाणात आमदारांची संख्या असल्यामुळं सरकारचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतानं मंजूर झाला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबरला तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सत्ताधारी महायुतीमधील भाजपकडे 132, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 41 आमदार आहेत. विरोधी महाविकास आघाडीतील काँग्रेसकडे 16, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 20 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 10 जागा आहेत.