‘असे हे सुंदर आमचे घर‘, फक्त सोनी मराठी वाहिनीवर – 14 मार्चपासून दररोज रात्री 8 वाजता.
सोनी मराठी वाहिनी आपल्या मालिका आणि कार्यक्रम यांमधून कायमच नावीन्य जपण्याचा प्रयत्न करते. अशीच एक नवी कोरी मालिका ‘असे हे सुंदर आमचे घर’ 14 मार्चपासून दररोज रात्री 8 वाजता सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे. या नव्या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी , सुकन्या मोने आणि संचिता कुलकर्णी अशा लोकप्रिय अभिनेत्रींचा समावेश आहे. अभिनेता संचित चौधरी या मालिकेत रितेश या भूमिकेत दिसणार असून दीपक आलेगावकर , संयोगिता भावे , मुकुंद फाटक , विजय पटवर्धन, प्रसाद पंडित , वेदश्री दाली, ओम जंगम, दीपेश ठाकरे अशी तगड्या कलाकरांची फळी या मालिकेत झळकणार आहे.
‘असे हे सुंदर आमचे घर’ या मालिकेत सासू-सुनेची धमाल जोडी आणि त्यांचं कुटुंब प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. तीन वेगवेगळ्या पिढ्यांमधल्या स्त्रिया आणि त्यांच्यातल्या जुन्या आणि आधुनिक वैचारिक भेदांमुळे काय घडतं आणि नेमके कोणाचे विचार बदलतात, हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये नारायणी म्हणजे उषा नाडकर्णी खाष्ट सासूच्या भूमिकेत तर सुभद्रा म्हणजे सुकन्या मोने प्रेमळ सासूच्या भूमिकेत दिसणार आहेत. उषा नाडकर्णी बर्याच वर्षांनी मराठी मालिकेत दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या एका कुटंबात स्त्रियांचे महत्त्व पटवून देण्यात काव्या म्हणजे मालिकेची नायिका संचिता कुलकर्णी यशस्वी होईल का, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वर्षानुवर्ष फक्त ‘घर एके घर’ असं जीवन जगलेल्या सुभद्रा म्हणजेच सुकन्या मोने यांना त्यांच्या घरात नव्यानी लग्न करून आलेली सून काव्या घरातून बाहेर पडून मोकळा श्वास घेण्यासाठी उद्युक्त करते. सासू आणि सून यांच्यामध्ये असणारं मैत्रीचं नातं ही मालिका अधोरेखित करणार आहे. तीन पिढ्यांतल्या सुना म्हणजे काव्या, सुभद्रा आणि नारायणी एकाच घरात वावरत असताना काय गमतीजमती घडतात, हे पाहणंही मनोरंजक ठरणार आहे.
मालिकेच्या प्रोमोनंतर प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिक्रिया आल्या असून सगळेच उत्कंठेनी मालिकेची वाट पाहताहेत. सोमवारपासून, 14 मार्चपासून दररोज रात्री 8 वाजता सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळेल.