* ३५० जनरल खाटा, ४० आयसीयू, १५ डायलिसिसची सुविधा
ठाणे : “अतिदक्षता विभाग, रक्तपेढी अपघात, महिला बाल, प्रसूतीकक्ष, अद्ययावत तयार करण्यात येत असून, नेत्र, आयुष, किचन, सिटीस्कॅन, शवागार आदी विभागांची कामे सिव्हिल हॉस्पिटलच्या नवीन जागेतील ओपीडी विभागात येत्या आठवड्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे. ही सर्व कामे प्रगतीपथावर आहेत.
जनरल विभागात रुग्णांसाठी ३५० खाटाचा कक्ष बांधला असून, पुढल्या आठवड्यात बाह्यरुग्ण (ओपीडी) कक्ष रुग्णांच्या सेवेसाठी खुला होणार आहे. रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी जिल्हा आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. ‘सिव्हील ‘जमीनदोस्त केल्यानंतर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या खोदकामाला सुरुवात झाली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ भूमिपूजनाचा कार्यक्रम गेल्या महिन्यात झाला होता. त्याठिकाणी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. मात्र यावेळी रुग्णांना त्रास होणार नाही, याची दक्षता “सिव्हील”नी घेतली होती. महत्वाचे वैद्यकीय कक्ष सुरू ठेवून रुग्णसेवा सुरू होती. संपूर्ण सिव्हील रुग्णालय मनोरुग्णालयानजिकच्या आरोग्य विभागाच्या जागेत हलवण्यात आले, त्यामुळे रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे ठाणे जिल्हा शल्य चिकत्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.
रुग्णालयात सर्व कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये अतिदक्षता विभागात ४० खाटा ठेवण्यात आल्या आहेत. डायलिसिसमध्ये १५, नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात २४ खाटा, पोषण पुनर्वसन केंद्रात १०, प्रसूती कक्षासाठी ३५ तर जनरल वॉर्डसाठी ३५० खटांची तयारी केली आहे शिवाय रक्तपेढीचे काम पूर्ण झाले आहे.
रुग्णांना चांगले उपचार मिळण्याच्या हेतूने स्थलांतरित केलेल्या सिव्हिल रुग्णालयात उत्तम सोयीसुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. येत्या आठवड्यात बाह्यरुग्ण कक्ष सुरू करण्याचा आरोग्य प्रशासनाचा प्रयत्न आहे शिवाय वैद्यकीय अधिकारी ओपीडी विभागात एकाच ठिकाणी रुग्णांना सेवा देतील अशा पद्धतीने कक्ष बांधला आहे, असे ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार म्हणाले.