जागतिक सफेद काठी दिनी ६००हून अधिक अंधांना काठ्या

रोटरी क्लब ऑफ ठाणे स्कायलाईनचा उपक्रम

ठाणे: रोटरी क्लब ऑफ ठाणे स्कायलाईन यांनी इनरव्हील क्लब ऑफ गार्डन सिटी आणि इनरव्हील क्लब ऑफ शायनिंग स्टार यांच्या सोबतीने अध्यक्ष प्रदीप जैन आणि डायरेक्टर अंजली नर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली १९ ऑक्टोबर २३ रोजी जागतिक सफेद काठी (अंधांचा तिसरा हात) दिवस (जो १५ ऑक्टोबरला असतो) गीता हॉल, भांडूप पश्चिम येथे साजरा केला.

किरकोळ वस्तू विकणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील गरीब अंधांना ६००हून अधिक पांढ-या काठ्या आणि खाऊचे वाटप केले. गेली १० वर्षे रोटरी क्लब ऑफ ठाणे स्कायलाईन, या उपक्रमासोबतच अंध पालकांच्या सुमारे २० मुलांचे शालेय शुल्क सुद्धा भरत आहे.

नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड (एन एफ बी) च्या मदतीने बदलापूर येथे ६ अंध भगिनींना घेऊन सुगंधित उटणे (दिवाळीत) आणि सात सुगंधी अगरबत्तीचे उत्पादन चालू आहे. अंजली नर्डेकर यांचे श्वसुर लेफ्टनंट गोविंद नर्डेकर (एनएफबी वरळीचे डायरेक्टर) यांनी जगभरात जाऊन अंधांसाठी औद्योगिक प्रशिक्षण घेऊन हे शिक्षण एनएफबीच्या माध्यमातून सुरू केले. एनएफबीच्या पायाभरणीस त्यांनी देवस्वरूप हेलन केलर यांना भारतात बोलाविले.

पं.नेहरुंपासून सर्व प्रतिष्ठीत राजकारणी लोकांना अंधसुद्धा औद्योगिक क्षेत्रात उत्पादनाचे काम करू शकतात हे सिद्ध करून दाखविले. त्यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोक-या मिळवून दिल्या. त्यांच्या कार्यात स्नुषा अंजली नर्डेकर या एनएफबी आणि रोटरी स्कायलाईनच्या मदतीने खारीचा वाटा उचलत आहेत.

या समारंभास स्कायलाइनचे शशी नर्डेकर, माजी अध्यक्षा संगीता कपूर माजी अध्यक्षा मृणाल सुर्वे, निता कलोरे, विनया कीर, रोशनसिंग नेगी तसेच इनरव्हील क्लब ऑफ गार्डन सिटीच्या अध्यक्षा रेणूका ठक्कर, सचिव शर्ली पेझारकर आणि इनरव्हील क्लब ऑफ शायनिंग स्टारच्या अध्यक्षा उज्वला अगरवाल, सचिव अर्चना नायर तसेच एनएफबीएमचे अध्यक्ष एल.एच. खापेकर, महासचिव दत्तात्रय जाधव, कोषाध्यक्ष ज्ञानोबा मरर्डे व प्रोजेक्ट डायरेक्टर देवबा पवार यांनीही मोलाचे सहकार्य केले.