ठाण्यात ५००हून जास्त मीटर लंपास
ठाणे : अवघ्या ४०० ते ५०० रुपयांसाठी या स्मार्ट मीटरची चोरी होत असून आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक मीटर चोरीच्या तक्रारी आल्या असल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली आहे. या चोऱ्या झोपडपट्टी भागात होत असल्याने प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत.
महापालिका हद्दीत एक लाख १३,३२८ नळजोडण्या असून त्यातील ८६ हजार नळ जोडण्यांवर हे मीटर बसविण्यात आले आहेत. पाणीचोरी, पाणीगळती आणि पाण्याचा वापर ठाणेकरांनी योग्य प्रमाणात करावा या उद्देशाने हे मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र या मीटरचे काम अचूक होत नसल्याचे ठाणेकरांना गेलेल्या देयकांमधून स्पष्ट झाले आहे. त्यांना वाढीव बिले जात असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. स्मार्ट मीटर बसविण्याचे काम खासगी संस्थेला देण्यात आले आहे. त्यानुसार एका मीटरमागे साधारणपणे सहा हजार ६०० रुपयांचा खर्च येत आहे.
स्मार्ट मीटरच्या बाबतीत ज्या काही त्रुटी येतील त्या दूर करण्याचे कामही संबंधित संस्थेला करावे लागत आहे. परंतु मागील काही दिवसांपासून संस्थेबरोबर महापालिकेचीही डोकेदुखी वाढल्याचे दिसत आहे. महापालिका हद्दीत खास करुन झोपडपट्टी भागात स्मार्ट मीटर चोरीला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. या संदर्भात ज्यांचे मीटर चोरीला जात आहेत, त्यांना पोलीस ठाण्यात तक्रारी देण्याच्या सुचना पालिकेने केल्या आहेत.
झोपडपट्टी भागातच होते चोरी..
स्मार्ट वॉटर मीटर बसवण्याबाबत आधीच झोपडपट्टी भागात नकारघंटा वाजवण्यात येत आहे. दुसरीकडे झोपडपट्टी भागातच या मीटरची चोरी होत असल्याने ही योजना झोपडपट्टी भागात बारगळण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत झोपडपट्टी भागात केवळ ४० टक्केच स्मार्ट मीटर बसवण्यात आले असल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे.
अशी होते चोरी
स्मार्ट मीटर लावण्यात आलेला पीव्हीसी पाईप कापून मीटर चोरले जात आहेत. या मीटरच्या खालील बाजूस पितळ आहे. ते विकून साधारणपणे ४०० ते ५०० रुपये मिळू शकतात. त्याच हेतूने मीटरची चोरी होत असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
मीटरच्या खालील बाजूस असलेल्या पितळेमुळेच ही चोरी केली जात असावी असे सध्या तरी दिसत आहे. ज्यांच्या मीटरची चोरी झाली आहे त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे कार्यकारी अभियंता अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.