गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या ज्यादा ११६४ एसटी बस फुल्ल!

ठाणे-पालघरमधून चाकरमान्यांचा उदंड प्रतिसाद

ठाणे: कोकणातील गणेशोत्सवासाठी २ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बस स्थानकांतून ४३०० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या सेवेला चाकरमान्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून ठाणे आणि पालघरमधून ११६४ गाड्यांचे आरक्षण झाल्याची माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

७ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे ठाणे विभागातून २९४, पालघर विभागातून ३८७ आणि मुंबई विभागातून ६२० अशा एसटीच्या १३०१ बसेस गट आरक्षणासह एकूण २०३१ जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झालेल्या आहेत.

ठाणे, पालघर आणि मुंबईतील कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ ते ७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

ठाणे विभागातून २९४ ज्यादा बसचे गट आरक्षण झाले आहे. ३१२ पूर्ण आरक्षित तर १०१ अंशतः आरक्षित बस अशा ७०७ बस फुल्ल झाल्या आहेत. पालघर विभागातून ३८७ ज्यादा बसचे गट आरक्षण झाले आहे. ६२ पूर्ण आरक्षित तर आठ अंशतः आरक्षित बस अशा ४५७ बस फुल्ल झाल्या आहेत. दरम्यान मुंबई विभागातून ८६७ ज्यादा बसचे आरक्षण झाले आहे. एकूण २०३१ ज्यादा बस आजच्या घडीला आरक्षित झाल्या आहेत.

२ ते ७ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत, असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.