मंकीपॉक्स: ठामपाची आरोग्य यंत्रणा अलर्ट

कळवा रुग्णालयाबरोबर ३० आरोग्य केंद्रांना मार्गदर्शक सूचना

ठाणे: मंकीपॉक्स विषाणू रोग संक्रमणाबाबत ठाणे महापालिका प्रशासनाने आरोग्य यंत्रणेला सावध केले असून कळव्याचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि ३० आरोग्य केंद्रांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

कोरोनानंतर आता मंकीपॉक्स संकट निर्माण झाले असून याचा एकही संशयित रुग्ण नसला तरी ठाणे महापालिकेने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. महापालिका क्षेत्रात एखादा संशयित रुग्ण आढळल्यास त्याची तपासणी करून त्याचा अहवाल पुण्याला पाठवण्यात येणार आहे. याशिवाय जेवढे संशयित सापडतील अशांची यादी देखील तयार करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

आरोग्य अधिकारी प्रसाद पाटील यांच्या म्हणण्यानुसार, “मंकीपॉक्समध्ये सामान्यतः ताप, पुरळ आणि सूज यांसारखी लक्षणे दिसतात आणि त्यामुळे अनेक वैद्यकीय गुंतागुंत होऊ शकते. ही लक्षणे सहसा दोन ते चार आठवडे दिसतात आणि हळूहळू बरी होतात. काहीवेळा प्रकरणे गंभीर असू शकतात आणि या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण 1-10 टक्क्यांपर्यंत असते. हा आजार प्राण्यांपासून माणसात आणि नंतर माणसापासून माणसात पसरू शकतो. ठाण्यात अजून एकही संशयीत नसला तरी, आरोग्य यंत्रणाना मात्र अलर्ट करण्यात आले असल्याचे उपायुक्त मनीष जोशी यांनी स्पष्ट केले आहे.