ठाणे: घोडबंदर येथील मोघरपाडा येथे मेट्रो कारशेडकरिता जमिनीची मोजणी करण्यासाठी गेलेल्या महसूल आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना संतप्त गावकऱ्यांनी पिटाळून लावले. पहिले मोबदला द्या, अशी मागणी गावकऱ्यांनी केली, त्यामुळे अधिकाऱ्यांना हात हलवत माघारी फिरावे लागले.
मेट्रो-४ वडाळा ते कासारवडवली हे काम जोरात सुरू आहे. या मेट्रोकरीता मोघरपाडा येथे मेट्रो कारशेडचे आरक्षण एमएमआरडीएने टाकले आहे. या जमिनी अजूनही या भागातील शेतकरी कसत आहेत. तेथे शेती केली जात असल्याने या भागातील गावकऱ्यांचा मेट्रो कारशेडला विरोध आहे. मागील काळात अनेकवेळा त्यांनी जमिन मोजणीला विरोध केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १७ ऑक्टोबर २०२२ रोजी बैठक झाली होती. या बैठकीत शेतकऱ्यांना नवी मुंबईच्या धर्तीवर २२.५ टक्के विकसित जमिन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु सात महिने उलटून गेल्यानंतर देखील स्थानिक आमदार प्रताप सरनाईक किंवा गावकऱ्यांना हा निर्णय कळविण्यात आला नाही. त्यांना त्याचा मोबदला देण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली नाही. असे असताना आज तहसीलदार श्री. बांगर आणि एमएमआरडीएचे अधिकारी जमिन मोजणी करण्यासाठी गेले असताना संतप्त गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना पिटाळून लावले, त्यामुळे या भागातील वातावरण तंग झाले होते.
याबाबत स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन यांना पत्र लिहून कारशेडची निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळत नाही तो पर्यंत जमिनीची मोजणी करण्यास शेतकरी विरोध करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.