भाईंदर: विरार रेल्वे स्थानकातून रविवारी दुपारी अपहरण झालेल्या चार वर्षांच्या मुलाची नऊ तासांत सुखरूप सुटका करण्यात वसई लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. याबाबत वसई लोहमार्ग मार्ग पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे.
शमशाद ऊर्फ असिफ मन्सूर पठाण (२५) असे आरोपीचे नाव असून हा मूळचा बिहारचा आहे. हा पाच ‘दिवसांपूर्वीच मुंबईत आला होता. २८ मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एक महिला तिच्या चार वर्षांच्या मुलासह विरार स्थानकात आली होती. तिला पाहून आरोपीने महिलेसोबत ओळख केली. तिच्या मुलाला एक वडापावही खाऊ घातला. स्थानकावरच महिलेला झोप लागली असता मुलाला घेऊन तो फरार झाला. जाग आल्यावर महिलेने मुलाला शोधले, पण तो सापडला नसल्याने तिने वसई लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन इंगवले यांनी तत्काळ रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी मुलाला घेऊन मुंबईच्या दिशेने लोकलमधून गेल्याचे दिसले. त्यांनी सर्व स्थानकातील गुन्हे शाखेकडे फुटेज पाठवले असता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये रात्री ११ वाजता आरोपी मुलासह सापडला. पोलिसांनी तत्काळ मुलाला ताब्यात घेऊन वसई लोहमार्ग पोलिस ठाण्यात दिले. मुलाला आईच्या ताब्यात देऊन आरोपी अटक केला आहे. हा आरोपी मुलाला बिहारला घेऊन जाणार होता, असे पोलिस तपासात उघड झाले.