नवी दिल्ली: 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले आहे. प्रथम सभागृहात राष्ट्रगीत गायन झाले, त्यानंतर मागील सभागृहातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. मोदींनंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील लोकसभा खासदारांनी शपथ घेतली.
जेव्हा शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव शपथेसाठी पुकारले गेले तेव्हा विरोधकांनी घोषणाबाजी केली. एनईईटी पेपर हेराफेरीप्रकरणी विरोधकांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेत पोहोचलेले पीएम मोदी म्हणाले, देश चालवण्यासाठी सर्वांची संमती आवश्यक आहे. सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे. संविधानाच्या मर्यादा पाळून देशाला पुढे न्यायचे आहे. देशाला जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे.
नवीन खासदार आज आणि उद्या संसदेत शपथ घेतील. तत्पूर्वी, भाजप खासदार भर्तुहरी महताब यांना सोमवारी सकाळी 10 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रोटेम स्पीकरची शपथ दिली. यावेळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू राष्ट्रपती भवनात उपस्थित होते.
महाराष्ट्रातील तीन मंत्र्यांनी संसदेत मायबोली मराठीमधून शपथ घेत मराठी बाणा जपल्याचे दिसून आले. यामध्ये पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपच्या रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे आणि शिवसेनेचे बुलडाणा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांचा समावेश आहे.