५१ हजारांचे प्रथम पारितोषिक
ठाणे: लहान मुलांमध्ये शिवरायांचा इतिहास जपण्यासाठी यंदा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्ह्यातील मुलांसाठी किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त ठाणे शहरातील किल्ले बनविणाऱ्या लहान मुलांच्या गटांना छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांची मूर्ती भेट देण्यात येणार असल्याची माहिती मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी दिली.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे किल्ले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव. दिवाळी म्हटले की, किल्ले तयार करण्याची चिमुकल्या शिलेदारांची लगबग सुरू होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौऱ्याची आणि त्यागाची दिवाळीतही सर्वांना आठवण राहावी, या उद्देशाने इमारतीसमोर, घरासमोर आणि मोकळ्या जागेत किल्ल्यांची प्रतिकृती बनवण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. टॉवर संस्कृतीमध्ये ही प्रथा कमी होत असताना दिसते. लहान मुलांमध्ये इतिहास नेहमीच स्मरणात रहावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील मुलांसाठी किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५१ हजार, द्वितीय पारितोषिक २१ हजार आणि तृतीय ११ हजार रूपये देण्यात येणार आहे. याशिवाय उत्तेजनार्थ २५ किल्ल्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण दोन लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच किल्ले बनविणाऱ्या गटांना छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांची मूर्ती देण्यात येणार असून या गटामध्ये किमान ८ ते १० मुले असणे आवश्यक आहे.
या किल्ले बनवा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ७९७७६८८०६२ व ९८१९६२६०६० यावर संपर्क साधावा, असे आवाहन मनविसेतर्फे करण्यात आले आहे.