बोरिवडे मैदान अतिक्रमणमुक्त करण्यासाठी अनोखे आंदोलन
ठाणे: ठाणे शहरातील घोडबंदर परिसरात बोरिवडे मैदान ठेकेदाराने गिळंकृत केल्याचा आरोप स्थानिक नागरिक व मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत अर्ज-निवेदने का आंदोलने होऊनही त्याची दखल घेतली जात नसल्याने आज मनसे पदाधिकाऱ्यांनी थेट नगर अभियंत्यांच्या दालनाबाहेर फुटबॉल खेळत निषेध व्यक्त केला.
ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात विविध जागांच्या आरक्षणाचा उल्लेख असून, काही ठिकाणी विकासकांकडून टीडीआरमार्फत विकासकामे केली जातात. घोडबंदर क्षेत्र हे जलद गतीने विकसित होत असून, येथे हावरे, रौनक, भूमी यासारखे मोठे विकासक काम करत आहेत. मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढल्याने ठाणे महानगरपालिकेने बोरिवडे येथे एक खेळाचे मैदान आरक्षित ठेवले आहे. पण या परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक मुलांना खेळण्यासाठी हक्काचे मैदान उपलब्ध नाही. ठेकेदाराने मैदानाच्या बहुतेक जागांवर कब्जा केला असून, तिथे आरएमसी प्लांट तसेच शेड उभारली आहे आणि पाईपची साठवणूक केली आहे. या अतिक्रमणाचा त्रास स्थानिक नागरिकांना नाहक सहन करावा लागत आहे.
बोरीवडे मैदान येथे अतिक्रमण झाल्याचे मनसेच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाला पत्रव्यवहार केल्यानंतर क्रीडा विभाग खडबडून जागे झाले व त्यांनी त्वरित महानगरपालिकेच्या नगर अभियंता, उपनगर अभियंता तसेच माजिवडे-मानपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार करून हे मैदान अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले पण या आदेशाचे पालन महानगरपालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नगर अभियंता करत नसल्याने मनसेच्या वतीने आज महानगरपालिकेच्या आवारात नगर अभियंतांच्या दालना बाहेर फुटबॉल खेळून निषेध नोंदवण्यात आला. या फुटबॉलवर निषेधाचे तसेच अतिक्रमणाचे छायाचित्र लावून तो नगर अभियंता यांना भेट देण्यात आला. या आंदोलनात दिनकर फुलसुंदर, देवेंद्र कदम, मनीष सावंत, अशोक यादव, सुभाष म्हात्रे, कृष्णदेव कोटा, वैभव ठाकरे आदी सहभागी झाले होते.
घोडबंदर येथील बोरिवडे मैदान येथे केलेले अतिक्रमण लवकरात लवकर हटवण्यात आले नाही तर मनसेच्या वतीने भविष्यात आयुक्तांच्या दालनाबाहेर निषेध नोंदवण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची असेल, असा इशारा मनसेचे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी दिला आहे.