ठाणे: कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेने माघार घेत भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याने भाजपची बाजू भक्कम झाली आहे. या मतदारसंघात आता भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे
कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सध्या सुरु आहे. या निवडणुकीत कोकण मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. या बाबतचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले होते तर कोकण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून निरंजन डावखरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र, या निवडणुकीत मनसे आणि भाजपा आमने-सामने येण्याची शक्यता होती. त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला होता, परंतु आता मनसेने कोकण पदवीधर निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे ॲड. डावखरे यांचा मार्ग सुकर झाला आहे.
मनसेचे श्री.पानसे यांनी त्यांचा कोकणात प्रचार करून चाचपणी देखिल केली होती. मनसेने सुमारे ३५ हजार मतदारांची नोंदणी करून निवडणुकीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चक्रे फिरली आणि अभिजीत पानसे अर्ज भरणार नाहीत, अशी माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत विधानपरिषदेच्या पदवीधर कोकण मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती होती. त्यानंतर मनेसेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मनसे आणि भाजपा आता आमने-सामने येणार नाहीत, हे स्पष्ट झालं आहे.
“देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांनी राज ठाकरे यांना विनंती केली होती. त्यानंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन अभिजीत पानसे हे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत, असा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. फक्त निरंजन डावखरे हे उमेदवार असतील, असं ठरलं आहे. देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्याकडे येऊन गेल्यानंतर पुन्हा एकदा ते दोनदा या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे”, अशी माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली.
विधानपरिषदेच्या कोकण मतदारसंघातून मनसेनी माघार घेतली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसारखं मनसे या निवडणुकीतही भाजपाला बिनशर्त पाठिंबा देणार का? असा प्रश्न नितीन सरदेसाई यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले, “याबाबत राज ठाकरे स्वत: बोलणार आहेत. मात्र, अशी गोष्ट वारंवार होणार नाही, असंही राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे”, असं नितीन सरदेसाई यांनी सांगितलं.
कोकण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी आज सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या बाबत त्यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
निरंजन डावखरे आणि अमित सरय्या यांचा अर्ज दाखल
आज भाजपकडून ॲड निरंजन डावखरे यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते गणेश नाईक आणि आमदार संजय केळकर उपस्थित होते. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अमित सरय्या यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुहास देसाई, प्रकाश पाटील, विक्रम खामकर आदी उपस्थित होते. यावेळी दोन्हीकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले.