मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बीडमधील परळी न्यायालयाने दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. यापूर्वी १० फेब्रुवारीला कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. वॉरंट मिळाल्यानंतरही कोर्टामध्ये गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
राज ठाकरे यांना १३ एप्रिलपर्यंत कोर्टात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, राज ठाकरे हजर न झाल्याने परळी कोर्टाने दुसऱ्यांदा राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
राज ठाकरेंविरोधात हे दुसरं अजामीनपात्र वॉरंट आहे. याआधी सांगली न्यायालयानेही ठाकरे यांना वॉरंट बजावले होते. २००८ मधील एका प्रकरणात हे वॉरंट जारी करण्यात आलं होतं, ज्यामध्ये त्यांच्यावर आयपीसीच्या कलम १४३, १०९,११७ आणि बॉम्बे पोलीस कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोन अजामीनपात्र वॉरंट जारी केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, यांनी ६ एप्रिल रोजी हे वॉरंट जारी केले होते. त्यानुसार मुंबई पोलीस आयुक्तांना मनसे प्रमुखांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते. एवढचं नाही तर या प्रकरणी न्यायालयाने पोलिसांना ८ जूनपूर्वी वॉरंटची अंमलबजावणी करून राज ठाकरे आणि मनसेच्या आणखी एका नेत्याला न्यायालयात हजर करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
दरम्यान, ऑक्टोबर २००८ साली मुंबईमध्ये राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती, या अटकेनंतर राज्यभरात अनेक ठिकाणी तोडफोड तसेच दगडफेक झाली होती. परळीतही अशा काही घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परळी पोलिसांनीसुद्धा या प्रकरणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यानंतर राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला होता. पण या प्रकरणाच्या तारखेला राज ठाकरे न्यायालयात गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.