भिवंडी लोकसभेसाठी मनसेची मोर्चेबांधणी

कल्याण : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभेचा आढावा घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण दौऱ्यावर आले आहेत.

सायंकाळी ५ च्या सुमारास राज ठाकरे यांचे कल्याणच्या दुर्गाडी किल्ला चौकात आगमन झाले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडत त्यांचे स्वागत केले. यानंतर कल्याण पश्चिमेतील स्प्रिंग टाइम क्लब येथे राज ठाकरे यांनी कल्याण मधील मुख्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत वैयक्तिक संवाद साधला. यामध्ये भिवंडी लोकसभा निवडणुक लढवायची की नाही याबाबत पदाधिकारी कार्यकर्ते यांची मते जाणून घेतली. यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याणमध्ये मनसे सक्रिय झाल्याने भिवंडी लोकसभा निवडणुक मनसेने लढविल्यास मनसेचा उमेदवार कोण असणार, किंवा मनसे कोणाला पाठिंबा देणार का याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.