ठाणे : पार्किंग प्लाझाचे रूपांतर हॉस्पिटलमध्ये न करता त्या ठिकाणी पार्किंग प्लाझाच ठेवण्याची मागणी ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे. तसेच कोविड सेंटरची गरज संपल्यानंतर पार्किंग प्लाझा सर्वसामान्य जनतेच्या चारचाकी व तीन चाकी गाड्या पार्किंग करण्यासाठी खुले करावे, अन्यथा आंदोलन करावे लागले असा इशाराही त्यांनी दिला आहे.
विवियाना मॉल शेजारील शेठ ग्रुपच्या विकासकाने कंस्ट्रक्शन टी.डी.आर. च्या माध्यमातून पार्किंग प्लाझा उभारून त्याचा मोबदला घेतलेला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेने त्या ठिकाणी कोविड सेंटर उभारल्यामुळे ठाणेकर नागरिकांना त्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. सद्यस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने या कोविड सेंटरचा वापर जरी कमी होत असला तरी भविष्यामध्ये जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तर अश्या तात्पुरत्या स्वरूपातील कोविड सेंटरची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पार्किंग प्लाझाचे रूपांतर हॉस्पिटलमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
पार्किंग प्लाझाची निर्मिती व्हावी, यासाठी आपण केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शेठ ग्रुपच्या विकास प्रकल्पामध्ये पार्किंग प्लाझा उभारण्यासाठी मान्यता दिली. जेणेकरून सर्वसामान्यांच्या चार चाकी व तीन चाकी एक हजाराहून अधिक गाड्या या ठिकाणी माफक आकारणी करून पार्क होऊ शकत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल. महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरामध्ये जास्तीत जास्त आरोग्य केंद्र व हॉस्पिटलची उभारणी करणे गरजेचे आहे ही वस्तुस्थिती असली तरी ही जागा हॉस्पिटलसाठी योग्य नाही. त्याचबरोबर पार्किंग प्लाझाची प्रत्येक मजल्याची उंची ही ८ फुटांपेक्षा कमी असून या जागेची निर्मिती पार्किंग प्लाझाच्या नियमानुसार करण्यात आलेली आहे. हॉस्पिटलसाठी ही जागा नियमानुसार वापरता येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे पार्किंग प्लाझाच्या शेजारीच ज्युपिटर हॉस्पिटलसारखे मोठे अद्ययावत हॉस्पिटल या ठिकाणी अस्तित्वात आहे. त्यामुळे हा प्रस्ताव चुकीचा असल्याने व कायद्याच्या कक्षेत बसत नसल्याने महानगरपालिकेच्या या चुकीच्या प्रस्तावाला राज्याचे नगरविकास विभागसुध्दा मान्यता देणार नाही, असे सरनाईक यांचे म्हणणे आहे. या संपूर्ण गोष्टीला निश्चित तीव्र विरोध राहिल व त्या विरोधामध्ये वेळप्रसंगी आपणास आंदोलनाची भुमिका घ्यावी लागेल,असा इशाराही सरनाईक दिला आहे.