बदलापूर: महाराष्ट्रातील सत्ता हातून गेल्यानंतर महाविकास आघाडीला शह बसावा यासाठी केंद्राकडून केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी केला.
बदलापूर येथे शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान प्रसंगी बोलताना खासदार राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप केले. मुख्यमंत्री होण्यासाठी श्री. फडणवीस यांचा आटापिटा आणि थयथयाट सुरू आहे, ते पद मिळत नसल्याने राज्यातील महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचे त्यांचे मनसुबे यशस्वी होत नसल्याचे खा. राऊत म्हणाले. महाराष्ट्रातून वसुली करण्यासाठी केंद्रीय एजन्सीना पाठवण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संभाजी महाराज फडणवीस यांच्या तालावर नाचत आहेत. भाजपच्या सांगण्यावरून सुरू असलेली आंदोलने फेल गेल्याची उदाहरणे खा. राऊत यांनी दिली. सख्खा भाऊ पण पक्का वैरी निघाल्याचे राज्यातील जनतेला पहायला मिळाल्याची टीका त्यांनी केली. बदलापूरला हक्काचा आमदार आणि खासदार येण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन खा. राऊत यांनी केले.
ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, शहरप्रमुख वामन म्हात्रे, माजी नगराध्यक्ष जयप्रकाश टांकसाळकर, माजी उप नगराध्यक्ष श्रीधर पाटील, एकनाथ शेलार, नरेंद्र शेलार, संजय गायकवाड, अविनाश मोरे , प्रकाश सावंत, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.