मिसिंग लिंक, सेवा रस्ते कमी करणार घोडबंदरचा ताण !

एमएमआरडीएकडून २३ रस्त्यांचे बांधकाम हाती

ठाणे : घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी या मार्गाला जोडणाऱ्या मिसिंग लिंक, सेवा रस्ते मुख्य रस्त्यांना जोडणे आदी २३ रस्त्यांचे बांधकाम प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतले असून यंदाच्या अर्थसंकल्पात या कामांसाठी मोठी तरतूद केली आहे. यामुळे भविष्यात या रस्त्यावरील वाहतूक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.

ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात दर्शवलेल्या ४०-४५ मीटर रुंद आणि १३.४४७ किमी लांबीच्या घोडबंदर मार्गाला समांतर ३३६४.६२ कोटी रुपये खर्चाचा बाळकूम ते गायमुख हा कोस्टल रोड विकसित करण्यात येणार आहे. या मार्गामध्ये ४८३ मीटर ओपन कट असून ४६२१ मीटर रस्ता बांधण्याजोगा आहे. तर ८३४३ मीटर रस्ता हा उतारावरील आहे.

या प्रकल्पासाठी ५४.२९ हेक्टर जमीन लागणार असून आतापर्यंत ३७.८५ हेक्टर म्हणजे जवळपास ७० टक्के जमीन उपलब्ध झाली आहे. तसेच ६.०८ हेक्टर जमीन संपादीत करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

मोघरपाडा येथील शासनाची १०.३६ हेक्टर जमीन एमएमआरडीएकडून संपादित केली जाणार आहे. घोडबंदरची कोंडी फोडणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्याअंतर्गत सुमारे २० किमीचे २३ रस्ते बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे घोडबंदरच्या मुख्य रस्त्याला पर्यायी रस्ते उपलब्ध हेणार आहेत. यासाठी ठाणे पालिका हद्दीत असलेल्या विविध मिसिंग लिंकचा शोध घेण्यात आला आहे. मेट्रो, पूल आदींमुळे हा मार्ग भविष्यात अरुंद होणार आहे. या पार्श्वभूमीवर नियोजित प्रकल्प या मार्गावरील ताण कमी करू शकणार आहे.

विकासकामांत या मुख्य मार्गांचा समावेश
पातलीपाडा जक्शनचे रुंदीकरण
माजिवाडा नाका ते लोढा कॉम्प्लेक्स
बाळकूम फायर ब्रिगेड ते लोढा कॉम्प्लेक्स
नागलाबंदर जक्शन ते तीरुपती बंगलो ते ओवळा
वाघबीळ गाव मुख्य रस्ता ते हिरानंदानी कॉम्प्लेक्स
पॅकं वुड ते संघवी हील्स ते हावरे सीटी
लोढा स्कोडोरा ते कोस्टल रोड
सुरेंद्र इंडस्टीज ते इंडन वुड
वेदांत हॉस्पिटील ते विहंग व्हॅली
मोघाडपाडा ते कासारवडवली बीएसयुपी बिल्डींगपर्यंत