उल्हासनगर : उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीमध्ये गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. ह्या व्यवहारात सामिल असलेल्या सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीसाठी ग्रामस्थ सोमवारपासून आमरण उपोषण करणार आहेत.
केंद्र शासनाकडून आलेल्या १४ वा आणि १५ वा वित्त आयोग तसेच इतर निधीमधून लाखों करोडो रुपयांची नियमबाहय कामे झाली आहेत. सरपंच प्रगती कोंगेरे, ग्रामविकास अधिकारी नितिन देशमुख, ग्रामसेवक गजानन कुटेमाटे यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप महेश देशमुख, महेश विजय खोत, दत्तु दशरथ सांगळे यांनी लेखी तक्रारीद्वारे केला आहे. उपोषणकर्त्यानी केलेल्या आरोपात पी.एफ. एम. एस. प्रणालीचा वापर न करता ठेकेदारास धनादेशाद्वारे परस्पर ५७ लाख रक्कम खर्च करणाऱ्या सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करणे, कोरोना संसर्गाचा फायदा उचलून कचरा गाडया खरेदी करणे, स्वर्गरथ खरेदी करणे, टि.सी.एल./मेडीक्लोर खरेदी करणे, कम्युनिटी किचन व रोड लाईट हायमास्ट खरेदी करणे हे सर्व साहित्य वाढीव दराने खरेदी केले असल्याने त्याची सखोल चौकशी करण्यात आलेली आहे, त्याआधारे कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तक्रार ११ महिन्यांपूर्वी गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्याकडे केली होती. मात्र त्यांनी वेळेत कारवाई न केल्याने त्यांना निलंबित करणे, सरपंच प्रगती कोंगरे यांना ३९ कलम अंतर्गत अपात्र करणे व ग्रामविकास अधिकारी, नितिन देशमुख यांना निलंबित करणे, या मागण्यांसाठी हे उपोषण करीत असल्याचे उपोषणकर्ते महेश देशमुख, महेश खोत आणि दत्तू सांगळे यांनी सांगितले.