मीरारोड ते विरार मेट्रो प्रवास होणार सुसाट

भाईंदर: मीरा-भाईंदर ते वसई-विरार शहरातील मेट्रो कामासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्वेक्षणाचे काम पुढील दीड महिना चालणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर मीरा-भाईंदरहून वसई-विरारचा मेट्रो प्रवास सुसाट होणार आहे.

वसई-विरार शहरातील मेट्रो कामासाठी सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले आहे. ही मेट्रो भाईंदर खाडीतून आणली जाणार असून, भाईंदर खाडीवरील प्रस्तावित पूलावरून मेट्रो आणण्याच्या कामाला एमएमआरडीएने प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर कामाला वेग आला आहे. हा 23 किलोमीटरचा मेट्रो मार्ग मीरा-भाईंदर ते विरारपर्यंत असणार आहे. त्यात 20 स्थानकांचा समावेश आहे. वसई-विरारची एकूण लोकसंख्या पाहता, तसेच मीरा-भाईंदर, वसईचे शहरीकरण लक्षात घेऊन हा मेट्रो मार्ग हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार वसई-विरारसाठी मेट्रो 13 ची घोषणा करण्यात आली आहे. सध्या मेट्रो मार्ग खाडीतून जाणार असल्याने अनेक तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यात येत आहे.

भाईंदर खाडीवरील प्रस्तावित पूलावरुन मेट्रो आणण्याचे ठरविण्यात आले आहे. खाडीवरुन रस्तापूल आणि मेट्रो अशी रचना असणार आहे. भाईंदर नायगांव मेट्रोसहित खाडीपूल करण्याबाबतची संरचनात्मक आराखडा तयारीचे काम प्रगतीपथावर आहे. भाईंदर-वसई पूलाचा आराखडा आणि संरचनात्मक आराखडा प्राधिकरणाच्या दळणवळण विभागाकडे अग्रेसित करण्यात आलेला आहे.

मेट्रो आणि खाडीपूल एकाच मार्गिकेवरून असले तरी, त्यांचे काम एमएमआरडीएच्या दोन स्वतंत्र यंत्रणेमार्फत केले जाणार आहे. भौगोलिक रचना, हवामान याचा देखील अभ्यास करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाचे काम येत्या दीड महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती एमएमआरडीएचे अभियंता बनसोडे यांनी दिली.

मीरा-भाईंदर या शहरात मेट्रो मार्गाचे स्थापत्य काम चालू असून, त्याच मार्गाला हा वसई-विरार मेट्रो मार्ग जोडला जाणार आहे. आता भाईंदर खाडीत प्रस्तावित पूल आणि मेट्रो एकाच ठिकाणाहून जाणार आहे. यामुळे खर्चात बचत देखील होणार आहे.