मीरारोड आणि भाईंदर रेल्वे स्थानके होणार हायटेक

खा.राजन विचारे यांनी घेतला कामांचा आढावा

ठाणे: बोरीवली रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर मीरारोड आणि भाईंदर या दोन रेल्वे स्थानकांचा डेक लेवलवर होत असलेल्या विस्तारीकरणाच्या कामाची पाहणी खासदार राजन विचारे यांनी आज एमआरव्हीसी आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केली.

खासदार राजन विचारे यांनी गेल्या आठ वर्षाच्या कार्यकाळात प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देऊन त्यांच्याच पाठपुराव्याने सन २०१७-१८ मध्ये मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकाच्या विकासाचा मुद्दा उपस्थित केला असता

एमआरव्हीसीने एमयुटीपी ३ ए च्या प्रकल्पामध्ये १९ रेल्वे स्थानकांचा विकास प्रकल्प अहवाल बनविण्यात आला होता. मार्च २०१९ ला रेल्वे बोर्डाकडून ९५० कोटीची मंजुरी या प्रकल्पासाठी मिळाली. त्यामध्ये मीरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानकांचा समावेश होऊन त्यांच्या विकासासाठी ११० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यापैकी मीरारोड रेल्वे स्थानकासाठी ६० कोटी तर भाईंदर रेल्वे स्थानकासाठी ५० कोटी खर्च होणार आहेत.

एमआरव्हीसीने पश्चिम रेल्वे मार्गावर सात रेल्वे स्थानके आणि मध्य रेल्वे मार्गावर १० रेल्वे स्थानके अशा १७ रेल्वे स्थानकांच्या विकासाची कामे सुरू केली आहेत. त्यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरील मीरा रोड आणि भाईंदर या रेल्वे स्थानकांचा बोरीवली रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर डेक लेवलवर होणाऱ्या विस्तारीकरण कामाची पाहणी करण्यात आली. या दोन्ही रेल्वे स्थानकांत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता आणि अपुरे पडणारे फलाट यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यापैकी मीरा रोड रेल्वे स्थानकात अस्तित्वात असलेले चार आणि अतिरिक्त दोन असे सहा फलाट तयार होणार आहेत. भाईंदर रेल्वे स्थानक येथील मूळचे सहा आणि अतिरिक्त एक असे सात फलाट होणार आहेत. भविष्यात लांब पल्ल्याच्या गाड्यांना या रेल्वे स्थानकांत थांबा मिळू शकेल.

आज खा.विचारे यांनी फलाटावरील पहिल्या मजल्यावरील डेक लेवलची पाहणी केली. त्यापैकी मिरारोड रेल्वे स्थानकातील सुरु असलेली कामे मार्च २०२५ मध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत. भाईंदर रेल्वे स्थानकात फेब्रुवारी २०२४ मध्ये काम सुरु होऊन डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन एमआरव्हीसीचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक विलास वाडेकर यांनी खासदार राजन विचारे यांना दिले.

मीरारोड रेल्वे स्थानकात पाच सरकते जिने तीन उद्वाहक, आठ जिने देण्यात येणार आहेत. फलाट क्र. १वर २७०X१०.७० मीटरचा उन्नत डेक, स्थानक इमारतीसह उत्तरेस ५०X २३.५ मीटरचा एफओबी आणि त्याला जोडणारा एक एक्सलेटर आणि चार जिने देण्यात येऊन फलाट क्र. १ ची लांबी व रुंदी ६.५ मीटर ते ११ मीटरपर्यंत करण्यात येणार आहे. मध्यभागात ४९ X१० मीटरचा पादचारी पूल वलनी त्याला तीन उद्वाहान, तीन एक्सलेटर आणि तीन जिने देण्यात येणार आहेत.भविष्यात फलाट क्र. ६ वर ९० मी. लांब व उत्तरेकडे रुंदी वाढवून त्याचा विस्तार ५.५ ते ९ मीटर होणार आहे आणि जुने पादचारी पूल काढण्यात येणार आहेत. फलाट क्र ६ च्या उत्तर दिशेच्या टोकावर भूमिगत पाण्याची टाकी एक पंप रूम तसेच शौचालये आणि विद्युत पुरवठा रूम, रेल्वे पोलिसांसाठी (आरपीएफ) व टीसी यांच्यासाठी रूम, पादचारी पुलावर सात खिडकी असलेले एक बुकिंग ऑफिस, रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तर आणि कर्मचाऱ्यांसाठी रूमची व्यवस्था असणार आहे.

भाईंदर रेल्वे स्थानकात तीन सरकते जिने, तीन उद्वाहक आणि दोन जिने, फलाट क्र. ६ वर ३०० X २२ मीटरचा उन्नत डेक, फलाट क्र. ६ ची एकूण लांबी आणि रुंदी ८.५ वरून १२ मीटरपर्यंत करण्यात येणार आहे. त्याला दोन जिन्यांची रुंदी वाढवून जोडणार आहेत. फलाट तीन आणि चारवर बेसमेंटला पार्किंग क्षेत्र विकसित करून वरील डेकवर तिकीट खिडकी आणि आरक्षण तिकीट खिडकी विकसित होणार आहे. रेल्वे पोलिसांसाठी (आरपीएफ) आणि टीसी यांच्यासाठी रूम, रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तर आणि कर्मचाऱ्यांसाठी रूमची व्यवस्था असणार आहे.