भाईंदर : मीरा-भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरणाकडून गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने शहरात पुन्हा एकदा कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. या शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यापैकी काही दशलक्ष लिटर्स पाणी भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या दिशेने वळविण्यात आल्याचा गंभीर आरोप महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी करतानाच स्टेम प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
मीरा-भाईंदर शहराला स्वतंत्र पाणी स्त्रोत नसल्यामुळे स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसी विभागाकडून मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यावर शहराला अवलंबून राहावे लागत आहे.यात स्टेम प्राधिकरण कडुन शहराला ८६ दशलक्ष लीटर तर एमआयडीसी विभागाकडून १३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. यातील स्टेम प्राधिकरणाची निर्मिती २०२० रोजी ठाणे महानगरपालिका, मीरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा परिषद अशा चार संस्थेनी मिळून केली आहे.
सध्यस्थितीत स्टेम प्राधिकरणात मीरा भाईंदर महानगरपालिका ३३ टक्के मालक असून सुमारे ८६ दशलक्ष लीटर प्रति दिवस पाणी पुरवठा मंजुर करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यापासून या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात येत असल्याने केवळ ७० ते ७५ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करण्यात येत आहे. त्यामुळे या पाणी टंचाईवर तोडगा काढण्याकरिता महापौर ज्योस्त्ना हसनाळे यांनी स्टेम प्राधिकरणाचे कार्यकारी संचालकांसह विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेला ६७ दश लक्ष लिटर पाणी पुरवठा मंजुर असताना ८० दश लक्ष लिटर पाणीपुरवठा होत असल्याचे कागदपत्रे दाखवून आरोप केले. मात्र स्टेम कडून भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरण कडून कोणतेही अतिरिक्त पाणी जात असल्याचे स्पष्टीकरण कार्यकारी संचालक सचिन घरत यांनी दिल्यानंतर ते पाणी भिवंडी-निजामपूर महानगरपालिका चोरी करत असल्याचे आरोप महापौर ज्योस्त्ना हसनाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन लावले आहेत.
*ठाणे महानगरपालिकेची मनमानी*
स्टेम प्राधिकरणाची निर्मिती २०२० रोजी ठाणे महानगरपालिका, मीरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी- निजामपूर महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा परिषद अशा चार संस्थांनी मिळून केली आहे. मात्र कालांतराने या संस्थेचे रूपांतर कंपनीमध्ये झाले असून ते कंपनी कायद्यानुसार कार्यरत आहेत. सध्या या कंपनीत ठाणे महानगरपालिकेची ५१ टक्के भागीदारी आहे. त्यामुळे या प्राधिकरणाच्या अध्यक्ष व महत्वाच्या पदी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त व राजकीय पुढारी बसत आल्यामुळे ते मनमानी कारभार करून मीरा भाईंदरला सापत्न वागणूक देत असल्याचे आरोप माजी आमदार नरेंद्र मेहता यांनीदेखील केला आहे.