मीरा-भाईंदर परिवहन सेवेचे तिकीट महागणार

भाईंदर : इंधनाच्या दरामध्ये भरमसाठ वाढ झाल्याने तोट्यात चालणाऱ्या परिवहन सेवेच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. या बाबतचा प्रस्ताव येत्या आठवड्यातील महासभेत मंजूर होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून वाढलेले खर्च विचारात घेता परिवहन सेवा सुरळीत चालविण्यासाठी प्रवासी तिकिटाच्या दराबाबत विचार करणे आवश्यक आहे. सध्याचे प्रवासी तिकिटाचे सर्वसाधारण बसचे दर हे २०१३ रोजी मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मंजूर केलेले आहेत. तसेच वातानुकूलित बसचे दर ऑगस्ट २०१६ मध्ये मंजूर केलेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कोणती प्रवासाची दरवाढ केलेली नाही. त्यामुळे परिवहन उपक्रमाला आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टीने प्रवासी तिकिटाच्या दरांमध्ये फेररचना करणे आवश्यक आहे.

मीरा-भाईंदर शहरालगतच्या इतर परिवहन उपक्रमापेक्षा तिकीट दर कमी आहेत. त्यामुळे मीरा-भाईंदर महापालिकेचा आर्थिक तोटा होत आहे. त्यामुळे सर्वसाधारण बसच्या भाड्यात वाढ तर वातानुकूलित बसचे भाडे कमी केले जाणार असल्याचा प्रस्ताव तयार केला असून येत्या शुक्रवारी महासभेत मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. त्यातच मागच्या काही वर्षात इंधनाच्या दरात मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. बसची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी लागणाऱ्या खुल्या साहित्याचे भाव देखील वाढले आहे. पालिकेची परिवहन सेवा सध्या एनसीसी विथ व्हिजिएफ तत्वावर चालवली .परंतु आगामी काळात परिवहन सेवेत इलेक्ट्रिक बस दाखल होणार असल्याने जीसीसी तत्त्वावर चालवण्याचा विचार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत वाढलेले खर्च व आगामी काळात इंधन व इतर गोष्टीचे वाढणारे दर लक्षात घेऊन प्रवासी तिकिटाच्या दरामध्ये फेरफार करण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे . त्यानुसार सर्वसाधारण बस प्रवासी तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे.