लोकार्पणाआधीच ठाणे पूर्वच्या मिनी चौपाटीला कळा

* लाकडी बैठकीला बुरशी,
* शोभेच्या झाडांनी टाकली मान

ठाणे पूर्वेच्या रहिवाशांची खंत

ठाणे : स्मार्ट सिटीच्या पंक्तीत बसलेल्या ठाणे शहरात महापालिकेच्या माध्यमातून विकासकामांचा सध्या धडाका सुरू आहे. पण ही विकासकामे होत असताना महापालिकेच्या संबंधित अधिका-यांचे या कामांकडे लक्ष आहे की नाही, अशी पृच्छा ठाणे पूर्वेतील रहिवासी करत आहेत. महापालिकेची ठाणे पूर्वेला सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे, अशी खंत स्थानिक व्यक्त करत आहेत.

चेंदणी कोळीवाडा बंदरावर म्हणजे मिनी चौपाटी म्हणून ओळखल्या जाणा-या ‘वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट’च्या माध्यमातून विविध प्रकारच्या सोयीसुविधांची कामे कूर्मगतीने सुरू आहेत. त्यामुळे ठाणेकरांसाठी ही कामे तापदायक ठरली आहेत. या सुविधांचा लोकार्पण सोहळा होण्याअगोदरच त्यांची पडझड होण्यास सुरुवात झाली. तेथील सुबक लाकडी वास्तूची बैठक पोखरण्यास सुरुवात झाली असून, लाकडांना बुरशीने घेरल्यामुळे बैठक डळमळीत झाली आहे. बसण्याची फळी तुटली आहे आणि खालचा भाग कुजण्यास सुरुवात झाला. सुशोभित उद्यानातील शोभेच्या झाडांनी मान टाकली असून, येथे बसवलेल्या कोळी शिल्पावरील प्लास्टिकचे आवरण असल्यामुळे ही शिल्पे बघण्यासाठी खुली केव्हा करणार, असा सवाल स्थानिक ठाणेकरांनी केला आहे.