बदलापूर: भूकंप सदृश धक्के बसल्याचे जाणवू लागल्याने आज भरदिवसा दुपारी बदलापूर हादरले, घाबरून नागरिक घराबाहेर आल्याने भीतीचे वातावरण पसरले.
बदलापुरात आज दुपारी दीड ते दोनच्या सुमारास पूर्वेकडील पनवेल रिंग रोड भागात अनेक इमारतींना मोठे हादरे जाणवले. हादरे एवढे तीव्र स्वरूपाचे होते की, सगळ्यात आधी हे धक्के भूकंपाचे असल्याचं इथल्या रहिवाशांना वाटलं. भयभीत अवस्थेतील रहिवासी हादरा बसल्यानंतर, इमारती बाहेर गोळा झाले. यावेळी हा हादरा इमारतीच्या पाठीमागील भागात, सुरु असलेल्या खदानीत झालेल्या तीव्र स्फोटाचा हा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
बदलापूर पूर्व पनवेल हायवे परिसरात रस्त्याच्या शेवटी असलेल्या देव लक्झुरिया या इमारतीमधील रहिवासी दुपारी दीड ते दोन च्या सुमारास, दुपारचे जेवण आणि इतर कामे करत असताना, अचानक भूकंप झाल्यासारखा मोठा धक्का बसला. यावेळी हा हादरा इतका मोठा होता की, अनेकांच्या घरातील सोफा उंचावर जाऊन आदळल्या सारखा हादरा रहिवाशांना बसल्याचे रहिवाशांनी सांगितले. आधी सगळ्यांना हा भूकंप असल्याचे वाटले. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत, इमारतींमधील रहिवासी इमारती बाहेर आले. मात्र त्यानंतर हा हादरा कसला होता हे या रहिवाश्यांच्या लक्षात आले.
इमारतीच्या पाठीमागील भागात, लागून असलेल्या दगड खाणीमध्ये एक मोठा स्फोट करण्यात आला. त्यामुळे जवळपास तीन किमी परिसरात हे हादरे जाणवले. त्यामुळे भयभीत झालेले नागरिक जीव मुठीत घेऊन इमारती बाहेर आले. येथील रहिवाशांनी सांगितल्याप्रमाणे, या दगड खाणीमध्ये दिवसातून अनेकदा ब्लास्ट केले जातात. मात्र आज ब्लास्ट करण्यात आला, त्याची तीव्रता सगळ्यात जास्त असल्याने, आम्हाला भूकंप झाल्याचे जाणवले. इतकेच नव्हे तर इमारतीला फक्त चार वर्षे झाली असून, या इमारतीच्या भिंतींना या रोज जाणवणाऱ्या हादऱ्यांमुळे तडे गेले आहेत. त्यामुळे या अशा प्रकारामुळे इमारतींना भविष्यात मोठा धोका निर्माण होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते.
खदानीत, रोज जिलेटिन वापरून मोठे स्फोट केले जातात. यापूर्वी या स्फोटांची तीव्रता कमी होती मात्र, या काही दिवसांमध्ये ही तीव्रता वाढली असून, आज झालेला स्फोटात जवळपास भूकंपाचा धक्का जाणवेल असा मोठा हादरा बसला. यासोबतच या खदानीला लागून, माती गोळा करणे, आणि दगड फोडण्याचे काम सुरू असते. आणि हे सगळं वाहून नेणाऱ्या मोठमोठ्या वाहनांमुळे, रोजच आम्हाला धुळीचा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली.