पाटणा : बिहार विधान परिषद सदस्य राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते सुनील कुमार सिंह यांना मोठा झटका बसला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नक्कल केल्यामुळे बिहारच्या वरिष्ठ सभागृहातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. बिहारच्या विधान परिषदेत पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांची नक्कल केल्यामुळे एखाद्या नेत्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
२०२० मध्ये सुनील सिंह यांना विधान परिषदेचे सदस्यत्व मिळाले होते. त्यांनी १२ फेब्रुवारीला विधान परिषदेत मुख्यमंत्री आणि जेडी(यू) प्रमुख नितीश कुमार यांच्या बोलण्याच्या शैलीची नक्कल केली होती. त्यानंतर त्यांच्यावर नितीश कुमार यांना अपमानित केल्याचा आरोप झाला आणि त्यांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यांनी यापूर्वीही अनेक प्रसंगी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला होता. जेडी(यू) नेते रामवचन राय यांच्या नेतृत्वाखालील आचार समितीने प्रभारी अध्यक्ष अवधेश नारायण सिंह यांना अहवाल सादर केल्यानंतर सिंह यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव वरच्या सभागृहाने आवाजी मतदानाने मंजूर केला.
सभागृहातील विरोधी पक्षनेत्या (एलओपी) आरजेडीच्या राबडी देवी यांनी या निर्णयाला विरोध केला आणि म्हटले की, परिषदेने सिंह यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे. परंतु, अध्यक्षांनी नकार देत सिंह यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी शिल्लक होता.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सिंह यांनी आरोप केला की, “मी अनेकदा त्यांच्या सरकारविरोधात भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित केल्यामुळे मुख्यमंत्री मला संपवण्याची धमकी देत होते. ते मला परिषदेतून बाहेर काढण्याची संधी शोधत होते. एप्रिलमध्ये मुख्यमंत्री कार्यालयात मला विधान परिषद सदस्य पदावरून हटविण्याचा कट रचण्यात आला होता. सिंह यांनी दावा केला की, त्यांना मुख्यमंत्र्यांची नक्कल केल्याचे आठवत नाही. ते असेही म्हणाले की, नक्कल करणे हा गुन्हा नाही. “आजवर अनेकदा खासदारांद्वारे पंतप्रधानांच्या वागणुकीची नक्कल करण्यात आली आहे, परंतु त्यांच्यावर कधीही कोणतीही कारवाई झाली नाही, असे ते म्हणाले.
कोण आहेत सुनील सिंह?
सिंह हे सारण येथील उच्च जातीचे राजपूत नेते आहेत. ते दोन दशकांहून अधिक काळापासून आरजेडीबरोबर आहेत. ते पक्षाचे कोषाध्यक्ष राहिले आहेत. लालू यांची कन्या सारण येथील आरजेडी उमेदवार रोहिणी आचार्य यांच्या प्रचाराचे नेतृत्व करून त्यांनी लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली. सिंह यांना ऑगस्ट २०२२ मध्ये लालू प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्धच्या आयआरसीटीसी प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात सीबीआयच्या छाप्यांचा सामना करावा लागला होता. २०२० मध्ये सिंह यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती २३ कोटी रुपयांपेक्षा जास्त होती.