प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वार्षिक अहवालातून स्पष्ट
ठाणे: ठाणे महापालिकेकडून घराघरांत पुरवठा केल्या जाणार्या पाण्याची गुणवत्ता सलग दुसर्या वर्षीही घसरल्याची बाब उघडकीस आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वार्षिक अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.
ठाणे महापालिकेने वर्षभरात प्रत्येक महिन्याला केलेल्या चाचणीत ९१ टक्के पाणी शुद्ध आढळले आहे. गेल्यावर्षी पाणी विभागातून वितरित होणारे पाणी ९३ टक्के शुद्ध होते. ९५टक्के इतका दर्जा असणे आवश्यक असताना तो ९१ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. हा दर्जा आणखी खालावला असून ठाणेकरांच्या हंड्यात येणारे पाणी अशुद्ध असल्याचा अहवाल खुद्द पालिकेच्या पर्यावरण विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आला आहे.
या अहवालात प्रथमदर्शनी सर्वकाही अलबेल असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी पाण्याच्या शुद्धतेबाबतचा अहवाल तितकासा चांगला नसल्याचे दिसून आले आहे. दरवर्षीप्रमाणे महपालिकेने पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध ठिकाणाहून पाण्याचे नमुने घेऊन चाचण्या केल्या. २०२३-२४ मध्ये १२,८२८ पाणी नमुन्यांपैकी ११,६३५ नमुने म्हणजे ९१ टक्के पाणी शुद्ध असल्याचे आढळून आले आहे. तर १,१९३ नमुने अशुद्ध आढळले आहेत. पिण्याच्या पाण्याचे ९५ टक्के नमुने हे पिण्यायोग्य असावेत असा मानक आहे. मात्र या निकषाची पुर्तता करण्यास ठाणे पालिकेला अपयश आल्याने या मानकाचा उल्लेख अहवालात करणे प्रशासनाने टाळले असल्याचे दिसते. २०२२ ते २०२३ पर्यंतचा पाणी अहवाल तपासला असता हे शुद्धतेचे प्रमाण दोन टक्क्यांनी घटले आहे.
ठाणे महापालिका हद्दीत सुमारे ५८५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी ११५ दशलक्ष लीटर पाणी ठाणे महापालिकेच्या स्टेममार्फत, एमआयडीसीतून १३५ दशलक्ष लीटर, मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर तर पालिकेच्या स्वतःच्या योजनेतून २५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. हे पाणी टेमघर येथील केंद्रात प्रक्रिया करून ते जलकुंभात साठवले जाते. गेल्यवर्षी जलकुंभांची संख्या ७१ होती. आता ती ८७ झाली असून ३० जलकुंभ प्रस्तावित आहेत. जलकुंभातून हे पाणी ९१० किमी लांबीच्या जलवाहिन्यांतून शहरातील प्रत्येक घरात पोहचवले जाते.
दरवर्षी पाणी शुद्धतेचा अहवाल प्रसिद्ध करताना पाणी वितरण आणि जलकुंभांच्या पाण्याच्या गुणवत्तेचा तपशील दिला जातो. मात्र यावर्षी अहवालामध्ये हा मुद्दा वगळण्यात आला आहे. शहरातील विविध भागातून गोळा केलेल्या पाण्याच्या नमुन्यावरून अहवाल तयार करण्यात आला आहे.
२०१७-१८ साली पाण्याची गुणवत्ता ९३ टक्के होती, ती २०२०-२०२१ ला ९६ टक्क्यांवर पोहचली. २०२०-२०२१ ला ९६ टक्क्यांवर पोहचली. त्यानंतर २०२१-२२ ला पुन्हा त्यात घसरण होत ९५ टक्के झाली. २०२२-२३ मध्ये ही वितरण व्यवस्था पुन्हा घसरून ९३ टक्के तर २०२३-२४ मध्ये ९१ टक्के झाली आहे.
ठाणे महापालिकेने वर्षभरात प्रत्येक महिन्याला पाण्याच्या नमुन्याची तपासणी केली आहे. यामध्ये जून, ऑक्टोबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये घेतलेले नुमूने सर्वाधिक अशुद्ध असल्याचे अहवालात म्हटले आहे. या तीन महिन्यांमध्ये ९० टक्के पाणी पिण्यायोग्य होते. वर्षभरात कोणत्याच महिन्यात मानांकानुसार ९५ टक्के पाणी शुद्ध नसल्याचे आढळले आहे.
गुणवत्तेची टक्केवारी
एप्रिल २०२३: ९३ टक्के, मे: ९४टक्के, जून: ९०टक्के, जुलै: ९१टक्के, ऑगस्ट: ९४टक्के, नोव्हेंबर: ९२टक्के, ऑक्टोबर: ९०टक्के, नोव्हेंबर: ९१टक्के, डिसेंबर: ९०टक्के, जानेवारी २०२४: ९३टक्के, फेब्रुवारी: ९१टक्के, मार्च: ९४टक्के