मिताली आणि मिताली यांचा एमआयजीच्या विजयात सिंहाचा वाटा

ठाणे: मिताली म्हात्रेची नाबाद शतकी खेळी आणि मिताली गोवेकरच्या नियंत्रित गोलंदाजीच्या जोरावर एमआयजी क्रिकेट क्लबने गतविजेत्या राजावाडी क्रिकेट क्लबचा ७० धावांनी पराभव करत पदापर्णालाच डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. एमआयजी क्रिकेट क्लबने २३९ धावांचे लक्ष्य दिल्यावर प्रतिस्पर्धी संघाला १६९ धावांवर रोखत विजय साकारला.

एमआयजी क्रिकेट क्लबच्या धावसंख्येत मितालीच्या जोडीने गार्गी वारंग आणि वैभवी राजाने मोलाचे योगदान दिले. मितालीने १०६ चेंडूत १२ चौकार मारत १०८ धावांची बहुमूल्य खेळी केली. गार्गीने नाबाद ४७ आणि वैभवीने ४० धावा केल्या. वैष्णवी पोतदार आणि निवेदी जैतपालने प्रत्येकी दोन बळी मिळवले.

सलोनी कुष्टे आणि निव्या आंब्रेने राजावाडी क्रिकेट क्लबला चांगली सुरुवात करुन दिली. पण इतर फलंदाज ढेपाळल्यामुळे राजावाडी क्रिकेट क्लबची स्पर्धेतील वाटचाल उपांत्य फेरीत संपुष्टात आली. सलोनी कुष्टेने ३१, निव्या आंब्रेने २३ आणि अंजली केसरकरने नाबाद १७ धावा केल्या. मिताली गोवेकरने तीन, स्वाती स्वेनने दोन, आर्या सुकाळे, महेक मिस्त्री आणि मिताली म्हात्रेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

संक्षिप्त धावफलक: एमआयजी क्रिकेट क्लब ४० षटकात ४ बाद २३९ (मिताली म्हात्रे नाबाद १०८; वैष्णवी पोतदार २/२६) विजयी विरुद्ध राजावाडी क्रिकेट क्लब ४० षटकात ८ बाद १६९ (सलोनी कुष्टे ३१; मिताली गोवेकर ३/२५)

सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू : मिताली म्हात्रे (एमआयजी क्रिकेट क्लब).