म्हस्के यांनी महापालिका लुटण्याचे काम केले-विचारे

ठाणे: नरेश म्हस्के कोरोना काळात घरात बसून होते, महापौर पदाच्या काळात त्यांनी काय काम केले? केवळ गोल्डन गँगचा लिडर म्हणूनच त्यांची ओळख होती. ठाणे महापालिका लुटण्याचे काम म्हस्के याने केले, असा आरोप राजन विचारे यांनी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदारकीचे पहिले तिकीट देखील माझ्यामुळेच मिळाले, असा टोला त्यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्याविरोधात थेट आरोप केले. या आरोपांना उत्तर देण्यासाठी श्री.विचारे यांनी देखील पत्रकार परिषद आयोजित करून सडेतोड उत्तरे दिली.

ते म्हणाले, नरेश म्हस्के हे २००५ सालीच एकनाथ शिंदे यांना वैतागून काँग्रेसमध्ये जाणार होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २०१३ मध्ये पाच आमदारांना घेऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. यांना पक्षनिष्ठेचा दाखला देण्याचा अधिकार काय? शिंदे यांनी वारंवार बंड करण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या शेवटच्या बंडापर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. मात्र त्यांना केवळ शिवसेना संपवायचीच होती, असा गंभीर आरोपही त्यांनी मुख्यमंत्र्यावर केला आहे.

आमच्यामुळेच विचारे निवडून येत होते, असे देखील शिंदे म्हणाले होते, मात्र मागील दोन निवडणुकीत केवळ आपल्या पुत्राचेच काम शिंदे यांनी केले. मी माझ्या कामावर निवडून आलो असल्याचा दावाही विचारे यांनी केला. शिंदे यांनी केलेले बंड, फोडलेली शिवसेना हे सर्व केवळ खुर्चीसाठीच होते, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

राजन विचारे स्वत:हून आले, त्यांनी सभागृह पद दिले हे सर्व खोटे आहे. धर्मवीर सिनेमाच्या दुसऱ्या भागामध्ये खरे तेच दाखवणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या आरोपांना राजन विचारे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. धर्मवीर चित्रपटाचे खरे दिग्दर्शक तुम्हीच मग चित्रपट खोटा कसा? असा टोला विचारे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

शिंदे यांना आमदरकीचे पाहिले तिकीट मीच मिळवून दिले. आरोप करण्यापेक्षा दोन वर्षात किती विकासकामे केली, ठाण्यासाठी काय-काय केले याची उत्तरे आधी द्या असा सवालही त्यांनी केला. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी शिवसेना तोडली, कॉंग्रेस, राष्ट्रवादी फोडली. केवळ सेटींगचेच राजकारण तुम्ही केले, असा आरोपही श्री.विचारे यांनी केला.

टेंभी नाक्याच्या देवीसमोर लागणारे बॅनर काढून त्या ठिकाणी शिंदे यांनी स्वत:चे बॅनर लावले. आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाची पाटी काढून तेथे स्वत:च्या नावाची पाटी लावली, त्यामुळे दिघे यांच्यावरील प्रेम काय होते, हे मला बोलायला लावू नका असा इशाराही त्यांनी दिला.

मला शिवसेनेत 40 वर्षे झाली, यांचा उदय दिघे साहेब गेल्यानंतर झाला आहे. बाळासाहेबांचे विचार शिवसेना फोडण्यासाठी कधीच नव्हते, मोठं वादळ येऊन सुद्धा त्यांनी पक्ष एकसंघ ठेवला. दिघे साहेबांवर बाळासाहेबांचा विश्वास होता, असेही श्री.विचारे यांनी स्पष्ट केले.