ठाणे : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडून ठाणे येथे पात्र अर्जांची 24 फेब्रुवारी रोजी संगणकीय सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडकरी रंगायतन नाट्यगृहात होणार आहे.
सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे व्यापक नियोजन करण्यात आले आहे तसेच अर्जदारांना सोयीस्कररित्या निकाल पाहता येण्यासाठी सभागृहाच्या आवारात आणि सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. ही सर्व प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ असल्याने यंदाच्या वर्षी सोडतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोकण मंडळातर्फे जाहीर केलेली सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दहा हजार दहा सदनिकांचा समावेश आहे. एकात्मिक गृहनिर्माण योजनेतंर्गत 1000 सदनिका, सर्वसमावेशक योजनेंतर्गत 919 सदनिका टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी 67 सदनिका आहेत. ‘प्रथम येणा-यास – प्रथम प्राधान्य’ योजनेंतर्गत 2278 सदनिका आणि यानुसारच इतर व्यतिरिक्त इतर सर्व योजनांसाठी 20टक्के प्रतिक्षा यादी ठेवण्याचा निर्णय मंडळाने ठेवला आहे.
मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा पालघर, रायगड येथील विविध गृहनिर्माण योजनेतंर्गत उभारलेल्या तब्बल 5311 सदनिकांच्या विक्रीसाठी असणार असून, प्राप्त 25078 पात्र अर्जांची संगणकीय सोडत शनिवारी जाहीर करण्यात येईल. या सोडतीसाठी आतापर्यंत एकूण 31, 871 अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह 25 हजार 78 अर्ज प्राप्त झाले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात येणा-या या सोडतीला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंह आदी उपस्थित राहतील.