अंबरनाथमध्ये 200 एकर जागेत म्हाडा उभारणार मेगा टाऊनशिप

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात म्हाडाकडून राज्यातील मोठा गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या 200 एकर जागेची गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच पाहणी देखील केली आहे. अंबरनाथ जवळील चिखलोली धरणाला लागून असलेल्या २०० एकर जागेचा म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून सर्व्हे करण्यात आल्याची गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली.

मुंबई आणि उपनगर परिसराची लोकसंख्येत झपाट्याने वाढत होत चालली आहे. मात्र लोकसंख्येचा  हा वाढता भार मुंबईला पेलवणारा नाही. त्यात सध्या डोंबिवलीपुढे, म्हणजे फक्त अंबरनाथ आणि बदलापूरमध्येच मोकळ्या जागा शिल्लक आहेत. त्यामुळे या परिसरात म्हाडाकडून मेगा टाऊनशिप उभारण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी सांगितले.

म्हाडातर्फे उभारण्यात येणारी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी टाऊनशिप असेल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. अंबरनाथ शहरात आत्तापर्यंत म्हाडाचा एकही प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. मात्र या परिसरात असणाऱ्या मूलभूत सुविधामुळे अंबरनाथसह बदलापूर  भागाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच चिखलोली धरणाच्या बाजूला असलेली २०० एकर जागा खरेदी करण्याचा म्हाडाचा विचार आहे. या जागेत आजवर म्हाडाकडून उभारण्यात आलेल्या टाऊनशिपपैकी महाराष्ट्रातली सर्वात मोठी टाऊनशिप उभारली जाणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. अंबरनाथ शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी मंत्री आव्हाड आले होते. चिखलोलीच्या प्रस्तावित जागेचा म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून ड्रोन सर्व्हे करण्यात आला. यावेळी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नितीन महाजन उपस्थित होते.

दरम्यान, या सर्वात मोठ्या टाऊनशिपसाठी जपानच्या शासकीय कंपनीसोबत बोलणी सुरू असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. प्रत्येकजण आपल्या मंत्री पदाच्या कारकिर्दीत एखादा मोठा प्रकल्प व्हावा, अशी प्रत्येक मंत्र्याची इच्छा असते. त्यामुळे हा प्रकल्प झाला, तर एक वेगळा आनंद मिळणार असून  पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा विकासाचा दृष्टिकोन कामाला येईल, अंबरनाथला म्हाडाची नियोजित टाऊनशिप झाली, तर ती शहराच्या विकासासाठी महत्त्त्वाची ठरेल, असा विश्वास मंत्री  जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.